एम. किसानने ५७ हजार शेतकरी जोडले

By admin | Published: August 12, 2015 11:18 PM2015-08-12T23:18:00+5:302015-08-12T23:18:00+5:30

घरबसल्या मिळणार माहिती : मालवण तालुक्यात सर्वाधिक ११ हजार ७२0 जणांकडून लाभ

M. The farmer added 57 thousand farmers | एम. किसानने ५७ हजार शेतकरी जोडले

एम. किसानने ५७ हजार शेतकरी जोडले

Next

गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी  पीक पेरणीविषयी मार्गदर्शन, हवामानाचा अंदाज, रोग प्रादुर्भावावर उपाय आदी शेती उपयोगी माहिती शेतकऱ्यांना एस. एम. एस. द्वारे मिळू लागली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ५७ हजार १९० शेतकरी ‘एम किसान’ पोर्टलच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. त्यामुळे घरबसल्या या शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज व रोगाविषयी माहिती समजू लागली आहे. केंद्र शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी किसान पोर्टल सुरु करण्यात आले असून यामध्ये कृषी संबंधित वेगवेगळ्या विषयाची माहिती उपलब्ध आहे. नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला हवामान, किड, रोग नियंत्रण, बाजारभाव, पीक उत्पादन आदींबाबत एस. एम. एस. द्वारे माहिती कळते. केंद्रशासनाच्या या एम. किसान पोर्टलवर शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबरची नोंद करून एस. एम. एस. सुविधेद्वारे किड, रोग, पीक संरक्षण याबाबतचे विविध सल्ले दिले जात आहेत. ‘एम. किसान’ पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत एस. एम. एस. सेवा दिली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात ६९७३, मालवण तालुक्यात ११७२०, कणकवली तालुक्यात ८४७५, वैभववाडी तालुक्यात ३८८४, कुडाळ तालुक्यात ७५७२, वेंगुर्ला तालुक्यात ३५७९, सावंतवाडी तालुक्यात ७७३३ व दोडामार्ग तालुक्यात ७२६४ असे एकूण ५७ हजार १९० शेतकरी या सेवेशी जोडण्यात आले आहेत.
या मोफत एस. एम. एस. सेवेशी अधिकाधिक शेतकरी जोडले जावेत यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागातील कृषी सहाय्यकांसह कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट्य ठरवून देण्यात आले आहे. या नोंदणीकृत शेतकऱ्यांना शेतीविषयक फायद्याचे एस. एम. एस. येवू लागल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदाच होऊ लागला आहे.



केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून एम. किसान ही पोर्टल सेवा राबविली. जिल्ह्यातील सर्व शेतकरी या योजनेमार्फत जोडले जावेत असे आदेशही देण्यात आले. मात्र, या योजनेची योग्य प्रसिद्धी न केल्याने शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत.
शेतकऱ्यांनी नजीकच्या तालुका कृषी कार्यालयात जावून नावनोंदणी करून आपला मोबाईल नंबर कृषी अधिकाऱ्यांकडे द्यावा.
त्यानंतर ज्या ज्या वेळी वातावरणातील बदल, पिकावर एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव होणे, त्यावर वापरण्यात येणारे किटकनाशक याबाबतचे एस. एम. एस. संबंधित शेतकऱ्यांना येण्यास सुरुवात होतील.


२ लाख ४३ हजार ७0९ अद्याप वंचित
जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या ३ लाख ८९९ एवढी आहे. त्यापैकी ५७ हजार १९० शेतकरी ‘एम. किसान’ या पोर्टल सेवेशी जोडले गेले असून तब्बल २ लाख ४३ हजार ७०९ शेतकरी या मोफत सेवेपासून वंचित राहिले आहेत. मुळात या योजनेचा उद्देश या शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत सांगण्यात न आल्याने हे शेतकरी वंचित राहिले आहेत.
जास्तीत जास्त लाभ घ्या : वाकडे
शेती क्षेत्रातील प्रगती साधण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एन. जी. वाकडे यांनी केले आहे.


अद्यापपर्यंत जिल्ह्यात ५७ हजार १९० शेतकरी एम. पोर्टल किसान पोर्टलशी जोडले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत शेतकरी नावनोंदणीच्या बाबतीत समाधानकारक नाही.
कारण महाराष्ट्रात सुमारे ४२ लाख शेतकरी एम. किसान पोर्टल सेवेचा लाभ घेत आहेत.
सिंधुदुर्गातील ही संख्या वाढविण्यासाठी आॅगस्ट महिनाअखेर कमीत कमी १ लाख ५० हजार शेतकरी या सेवेशी जोडले गेलेच पाहिजेत.
असे आदेश केंद्राकडून जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. कृषी सहाय्यकांसह कृषी अधिकारी, कर्मचारी यांना नोंदणीचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे.

Web Title: M. The farmer added 57 thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.