एम. एच. मरिगौंडा --कृषिक्रांतीचे शिलेदार

By admin | Published: September 20, 2015 09:14 PM2015-09-20T21:14:55+5:302015-09-20T23:42:03+5:30

शास्त्रशुध्द फळबागांची निर्मिती

M. H. Marigonda - Shawls of Agriculture | एम. एच. मरिगौंडा --कृषिक्रांतीचे शिलेदार

एम. एच. मरिगौंडा --कृषिक्रांतीचे शिलेदार

Next

वनस्पतीपासून मिळणाऱ्या अन्न पदार्थामध्ये वनस्पतींचे सर्व घटक अन्न म्हणून स्विकारले गेले आहेत. गाजर, बीट, कंदमुळे ही मुळे जशी आहारात वापरली जातात. तशीच पाने ही देखील अन्न म्हणून वापरली जातात. तृणधान्य ही तर प्रमुख अन्नघटक बनली आहेत. विविध जीवनसत्वे, क्षार यासाठी फळांचा वापर मानवी संस्कृतीचा जेव्हापासूनचा इतिहास माहिती आहे तेव्हापासून दिसून येतो. ‘शबरीची बोरे’ हे रामायणातील महत्वाचे प्रकरण आहे. फळांचे महत्व शालेय शिक्षणापासून आपणास शिकवले जाते. या फळांचे उत्पादन वाढावे यासाठी शास्त्रशुध्द पध्दतीने फळबागांची निर्मिती करण्याचे यशस्वी प्रयत्न करणारे आणि भारतात फलोद्यान शास्त्र विकसित करणारे असे फलोद्यान शास्त्राचे जनक म्हणजे डॉ. एम. एच. मरिगांैडा.
डॉ. मरिगौंडा यांचा जन्म ८ आॅगस्ट, १९१६ रोजी म्हैसूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण म्हैसूर येथे झाले. त्यांनी लखनौ विद्यापीठातून वनस्पतीशास्त्राची एम. एस्सी. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर सन १९४२मध्ये त्यांची सहाय्यक उद्यान अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. शासकीय उद्यानाचे अधीक्षक रावबहाद्दूर एच. सी. जावराया यांच्या देखरेखीखाली ते लालबाग उद्यानाचे काम पाहू लागले. त्यांच्या कामातील प्रगती पाहून सन १९४७मध्ये फलोद्यानाचे सखोल प्रशिक्षण मिळावे म्हणून त्यांना रॉयल बोटॅनिकल गार्डन, इंग्लंड येथे पाठवण्यात आले. सहा महिने तेथील उद्यानांचा अभ्यास करून ते अमेरिकेला गेले. तेथे त्यांनी प्रसिध्द हॉर्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला आणि तेथून पीएच. डी. पदवी प्राप्त केली.
त्यानंतर लगेच सन १९५१मध्ये ते भारतात परत आले. परत येताच त्यांना पदोन्नत करून उद्यान उपअधीक्षकाचे पद देण्यात आले आणि थोड्याच दिवसात ते लालबाग उद्यानाचे अधीक्षक बनले. सन १९६३मध्ये त्यांना फलोद्यान विभागाचे म्हैसूर राज्याचे संचालक बनवण्यात आले. त्याकाळी फलोद्यान विभाग हा अत्यंत दुर्लक्षित होता. म्हैसूर राज्यात फलोद्यान क्षेत्राचा त्यांनी मोठया प्रमाणात प्रसार केला. एवढंच नव्हे तर त्यांनी लोकांना फळबागा लावण्यासाठी प्रोत्साहितही केले.
त्यापूर्वी कृषी विभागांतर्गत फलोद्यान विभाग होता. मात्र, मारिगौंडा यांनी विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवून फलोद्यान विभागाची स्वतंत्र निर्मिती केली. त्यांनी फलोद्यानासाठी चतु:सूत्री तयार केली. पूर्ण राज्यात ३८० ठिकाणी फळबागा आणि रोपवाटिका तयार केल्या. या रोपवाटिका केवळ रोपवाटिका नव्हत्या तर नवीन वाणांची निर्मिती करणारी केंद्रे होती. फळांच्या लागवडीची आणि संगोपनाची नवी तंत्रे निर्माण करणारी केंद्रे बनली. विषेशत: नारळाच्या नव्या वाणांची निर्मिती मोठया प्रमाणात करण्यात आली. बेल्लार आणि कन्नमंगल या केंद्रांनी केलेल्या कार्यामुळे डॉ. मारिगौंडा यांचे नाव भारतभर झाले. फळबागांच्या प्रयोगासाठी मारिगांैडा यांनी रोपवाटिकांबरोबर प्लँट प्रोटेक्शन, लॅबोरेटरी, मृद संधारण प्रयोगशाळा आणि बीज चाचणी प्रयोगशाळांची लालबाग उद्यानात स्थापना केली.
फळांचे मोठया प्रमाणावर उत्पादन झाल्यावर त्यांचे जतन करणे आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्वाचे असते. फळातून अनावश्यक पाणी काढून टाकण्याचे तंत्र आणि यंत्र विकसित केले. त्यांनी विविध वाण स्वत: तयार केले आणि जनतेपर्यंत पोहोचवले. जिरायती शेतीत फळबागा लावण्यासाठी त्यांनी जनतेला प्रोत्साहित केले. निव्वळ पावसाच्या पाण्यावर उत्तम उत्पादन देणाऱ्या अनेक फळबागा निर्माण करून समाजासमोर आदर्श उभा केला. आपोआपच शेतकऱ्यांनी त्यांचे अनुकरण केले आणि हळूहळू शेतकऱ्यांचा फळबागांकडे ओढा वाढू लागला.
कोणत्या फळबागेत कोणते आंतरपीक घ्यावे हे स्वत: प्रयोग करून त्यांनी समाजापर्यंत पोहोचवले. त्यांच्या या अजोड कामगिरीमुळे कर्नाटक फळांचे राज्य बनले. भरपूर उत्पादन देणारे ‘मलिका’ आंबा बाण त्यांच्याच काळात प्रसिध्द झाले. सन १९७६ला ते सेवानिवृत्त झाले आणि सन १९९२ला निधन होईपर्यंत बेंगलोर येथे वास्तव्य केले, मात्र, अखेरच्या श्वासापर्यंत ग्रामविकास आणि फलोद्यान क्षेत्रात ते कार्यरत राहिले.
- डॉ. व्ही. एन. शिंदे
उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

Web Title: M. H. Marigonda - Shawls of Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.