मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह ओरोस ऐवजी कुडाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 05:51 PM2017-10-14T17:51:36+5:302017-10-14T18:02:19+5:30
तत्कालीन आघाडी सरकारने ओरोस येथे मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला होता. पण युती सरकारने जागेचे कारण देत हे नाट्यगृह ओरोस ऐवजी कुडाळ येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे. कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या बाजूच्या शासकीय जागेत हे नाट्यगृह उभारण्यात येणार आहे.
अनंत जाधव
सावंतवाडी , दि. १४ : तत्कालीन आघाडी सरकारने ओरोस येथे मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला होता. पण युती सरकारने जागेचे कारण देत हे नाट्यगृह ओरोस ऐवजी कुडाळ येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे. कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या बाजूच्या शासकीय जागेत हे नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. याला राज्य शासनाने हिरवा कंदील दिला असून याची निविदा प्रकियाही लवकरच होणार आहे.
आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत २००८ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्रिमंडळ बैठक झाली होती. या बैठकीत विविध स्मारकांचे प्रस्ताव ठेवण्यात आले होते. त्यात भाईसाहेब सावंत, वि. स. खांडेकर स्मारक उभे करण्यात येणार होते. त्यातच मच्छिंद्र कांबळी यांच्या नावाने अद्ययावत असे नाट्यसंकुल ओरोस येथे उभारण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता. त्यासाठी चार कोटीचा निधीही प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र गेल्या सात ते आठ वर्षात या नाट्यगृहाची विटही बसली नाही. साधा जागेचा गुंताही सुटला नाही.
त्यामुळे राज्य शासनाने मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाच्या कामाबाबत आढावा घेतला. त्यावेळी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाºयांनी ओरोस येथे पुरेशी जागा नाही. तसेच नाट्यगृह उभे केले तर त्याची देखभाल कोण करणार, असे अनेक सवाल उपस्थित केले. त्यानंतर शासनाने हे नाट्यगृह ओरोस ऐवजी अन्य ठिकाणी उभारण्यास मान्यता दिली. त्याप्रमाणे हे नाट्यगृह आता कुडाळ येथे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तहसीलदार यांच्या कार्यालयाच्या शेजारची ५० गंठे शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याला जिल्हाधिकाºयांनी मंजुरी दिली आहे.
जो नवीन नाट्यसंकुलाचा चार कोटीचा आराखडा बांधकाम विभागाने तयार केला आहे तोही शासनाकडे पाठविण्यात आला असून त्यालाही शासनाने मंजूरी दिली आहे. हे नाट्यगृह सातशे खुर्च्यांचे असणार आहे. त्याशिवाय या नाट्यगृहात दैनंदिन स्वच्छता राहिली पाहिजे यासाठी नाट्यगृहाच्या सभोवताली दुकान गाळेही असणार आहेत. त्यातून सर्व खर्च उभा करण्यात येणार आहे.
नाट्यगृह बांधून झाल्यानंतर ते कुडाळ नगरपंचायतीकडे हस्तांतरित करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. त्यामुळे त्याचा फायदा कुडाळवासीयांना होणार आहे. नाट्यगृहाच्या बांधकामाची निविदा लवकरच बांधकाम विभाग काढणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच मुंबईच्या धर्तीवर हे नाट्यगृह होणार आहे.
कुडाळचे नाट्यगृह अद्ययावत असणार : बच्चे
कुडाळ येथे उभारण्यात येणारे मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह अद्ययावत असणार आहे. सातशे खुर्च्यांचे हे नाट्यगृह असणार असून त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच याची निविदा प्रकियाही पूर्ण होणार आहे, असे सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांनी सांगितले.