कुणकेश्वर यात्रेसाठी यंत्रणा सज्ज
By admin | Published: February 4, 2015 09:47 PM2015-02-04T21:47:40+5:302015-02-04T23:51:38+5:30
आरोग्य विभागाचे यात्रा नियोजन : ३ रुग्णवाहिकांसह १२३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
शिरगांव : देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना शासनाच्यावतीने आरोग्य विभागामार्फत विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून यात्रा काळात कोणत्याही आरोग्यविषयक समस्येला सामोरे जाण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. याचे योग्य नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देवगड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. कोंडके यांनी दिली आहे.श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे १७ फेब्रुवारीपासून यात्रेस सुरुवात होणार असून या यात्रेसाठी दूरदूरहून भाविक कुणकेश्वर येथे येतात. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी शासनाच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्यविषयक सोयीसुविधा दरवर्षी पुरविण्यात येतात. याचे नियोजन आता पूर्ण झाले असून यात्रा कालावधीत २४ तास वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी चार आरोग्यपथके तयार करण्यात आली आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुणकेश्वर, देवळानजीक भक्तनिवास येथे, प्राथमिक आरोग्यकेंद्र मिठबांव व इळये येथे ही पथके असणार आहेत. प्रत्येक आरोग्य पथकास दोन वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यिका, दोन आरोग्यसेविका, परिचर असे सहा कर्मचारी असणार आहेत.प्राथमिक आरोग्यकेंद्र मिठबांव व इळये येथे प्रत्येकी चार चार तर ग्रामीण रुग्णालय देवगड येथे १० कॉटची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा काळात देवगड येथील खासगी डॉक्टरांचाही रुग्णसेवेत सहभाग असणार आहे. २४ वैद्यकीय अधिकारी, दोन आरोग्य पर्यवेक्षक, १४ आरोग्य सहाय्यक, १४ आरोग्य सहाय्यिका, २८ आरोग्य सेविका, २८ आरोग्य सेवक, ७ परिचर, २ औषध निर्माता, २ रुग्णवाहिका चालक असे १२३ कर्मचारी यात्राकाळात कार्यरत राहणार आहेत. कुणकेश्वर येथे एक सार्वजनिक नळयोजना, आठ खासगी सार्वजनिक विहिरी, ४३ खासगी विहिरी, दोन खासगी बोअरवेल असे एकूण ५४ पाण्याचे स्त्रोत आहेत. यांचे १ जानेवारी २०१५ पासून यात्रापूर्व तयारीकरीता पाणी नमुने घेण्यात आले असून १ फेब्रुवारीपासून नियमित पाणी शुद्धीकरण करण्यात येत आहे. पाणी शुद्धीकरणासाठी लागणारी टीसीएल पावडर व लिक्विड क्लोरीन बॉटल पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. पाणी शुद्धीकरण व ओ. टी. परीक्षणासाठी चार टीम कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
भाविकांसाठी अभिरुची हॉटेलनजीक ६ शौचालये, ८ मुताऱ्या, ग्रामपंचायतीसमोर ४ शौचालये व ३ मुताऱ्या, भक्तनिवास येथे १५ शौचालये उपलब्ध करण्यात येणार आहेत. यात्रेच्या ठिकाणी असलेली हॉटेल्स, खाणावळी, शीतगृहे, भेलपुरी, आईस्क्रीम, हातगाड्या आदी व्यावसायिकांची आरोग्यदृष्ट्या पहाणी करून आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून घेण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व भक्तनिवास येथे आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. प्रथमोपचार कक्षात सर्व अत्यावश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात येणार असून पाणी शुद्धीकरणासाठी मेडीक्लोरचे वाटप करण्यात येणार आहे.
श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत २४ तास चांगली सेवा पुरविण्यात येणार आहे असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. कोंडके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
फिरत्या रूग्णवाहिकांची तजवीज
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली अशा दोन पथकांची खास स्थापना करण्यात आली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसह फिरती रुग्णवाहिका देण्यात येणार आहे.
यात्रेच्या ठिकाणी कायमस्वरूपी दोन रुग्णवाहिका ठेवण्यात आलेल्या आहेत.