पाण्याचे व्यवस्थापन खोरेनिहाय व्हावे माधव
By admin | Published: November 17, 2015 11:24 PM2015-11-17T23:24:17+5:302015-11-18T00:04:47+5:30
चितळे : चिपळूण नगर परिषदेतर्फे जलतज्ज्ञांचा नागरी सत्कार
चिपळूण : कोकणाला भौगोलिक अशी परंपरा लाभली आहे. तो आर्थिक दुर्बल का राहिला, याचा विचार करुन हे चित्र बदलायचे आहे. पाण्याचे व्यवस्थापन खोरेनिहाय होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांनी केले.
शहरातील गुरुदक्षिणा सभागृहात नगर परिषदेतर्फे चितळे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत आहे. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा सावित्री होमकळस, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, लोकमान्य टिळक वाचन मंदिरचे अध्यक्ष अरविंद जाधव, उपनगराध्यक्ष शौकत काद्री, रणजित खानविलकर, डॉ. दत्ताजी देशकर, श्रीरंग कद्रेकर आदींची उपस्थिती होती. कोयना परिसरात मोठा भूकंप झाला. यामध्ये २०० जण दगावले. घरांचेही नुकसान झाले. भूकंपातून प्रकल्प सावरण्याची जबाबदारी आपणावर आली. त्यामुळे चिपळूण शहराशी आपला प्रदीर्घ संबंध आहे. भूकंपाचे हादरे शहराला बसले. मात्र, येथील मानसिकतेला तडा गेला नाही, ही आनंदाची बाब आहे. भूकंप क्षेत्रात परशुराम एज्युकेशन सोसायटीने शाळा काढल्या. त्यामध्ये चिपळूण नगरीचेही ऋण आहे. कोकणातील माणसाचं जवळून निरीक्षण करण्याचा योग यानिमित्ताने आला, असे चितळे म्हणाले.
कोकणाला भौगोलिक परंपरा आहे. पाण्याचे व्यवस्थापन व नियोजन कसे करायचे, याची तरतूद घटनेत आहे. कोकणामध्ये २५ खोरी आहेत. येथील लोक ही खोरी कशी हाताळणार, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. येथील तरुण नोकरीसाठी मुंबईला जात आहेत. कोकणाच्या गळ्यात मुंबई ही धोंड आहे. आपली ताकद कशात आहे, याची विचार करण्याची गरज आहे. यापूर्वी पाण्याचा विनियोग करीत होतो. परंतु, भविष्यात यावर लोकसहभागातून जनजागृतीची आवश्यकता आहे. पऱ्हे, तलाव शोधून काढून त्याचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. नव्या आधुनिक व्यवस्थेत यायचे असेल तर आपली दृष्टी मुंबईकडे आहे ती कोकणाकडे वळवली पाहिजे. कोकणातील विकासाचा पाया कच्चा आहे. वेगळा स्वतंत्र विभाग म्हणून कोकणकडे पाहिले पाहिजे. वेगळ्या पद्धतीने समाज जीवनाचा विचार व्हायला हवा, असेही चितळे यांनी सांगितले. (वार्ताहर)