माफियांनी उखडले किनारे

By admin | Published: March 9, 2015 09:32 PM2015-03-09T21:32:01+5:302015-03-09T23:55:47+5:30

नागरिकांत संताप : शेकडो टन वाळूचे होतेय उत्खनन...

Mafiany shoved edges | माफियांनी उखडले किनारे

माफियांनी उखडले किनारे

Next

रत्नागिरी : पर्यटनवृध्दिसाठी जिल्ह्यातील ज्या सागरी किनाऱ्यांकडे पाहिले जात आहे, ते किनारेच वाळूमाफियांकडून उखडले जात आहेत. दिवसाढवळ्या रत्नागिरीतील विविध किनाऱ्यांवरील शेकडो टन पांढरी वाळू (सिलिका) वाळूमाफियांकडून उत्खनन करून चोरली जात आहे. रत्नागिरीतील पांढरा समुद्र, काळबादेवी, आरे-वारे, ढोकमळे याठिकाणची वाळू राजरोसपणे काढली जात असून, महसूल विभाग मात्र याकडे पूर्णत: दुर्लक्ष का करत आहे? सागरी किनाऱ्यावरील वाळूउपसा करण्याचे परवाने देण्यात आले आहेत काय? असे संतप्त सवाल आता नागरिकांतून विचारले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून नद्यांमधील वाळू उपसा करण्यावर शासनाचे निर्बंध आल्यानंतर वाळूमाफियांनी आता किनाऱ्याकडे मोर्चा वळविला आहे. तालुक्यात किनारपट्टीवर अनेक ठिकाणी शेकडो टन वाळूचे साठे करण्यात आले आहेत. दररोज हे सागरी किनारे वाळू उत्खननाच्या नावाखाली उखडले जात आहेत. त्यामुळे सागरी लाटांमुळे धूप होण्याऐवजी वाळू उत्खननामुळे सागराच्या शेजारील वस्तींना धोका निर्माण होणार आहे.
रत्नागिरीजवळील पांढरा समुद्र येथे दररोज शेकडो टन वाळू काढली जात असून, वाहने व बैलगाड्यांद्वारे ही वाळू वाहून नेली जात आहे. त्यामुळे ज्याठिकाणी काही समाजसेवी संस्थांनी स्वच्छतेचा नारा देणारे फलक लावले आहेत, त्या भागातच खड्ड्यांचे साम्राज्य आहे. मिरकरवाडा बंदरातील गाळ म्हणून काढलेली वाळूही चोरीचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे हा ढिगाराही सर्वत्र पोखरलेला असून, त्यातील शेकडो टन वाळूची चोरी झाली आहे.
बेकायदा उपसा केलेली किनाऱ्यावरील वाळू वाहनांबरोबरच बैलगाड्यांमधूनही वाहून नेली जात आहे. काळबादेवी येथील किनाऱ्यावर बैलगाड्यांचा वापर अधिक प्रमाणात केला जात आहे. रोज येथे दहा बैलगाड्या वाळू वाहतुकीसाठी कार्यरत आहेत. त्यांच्या दिवसाला ६० ते ७० फेऱ्या होतात. बैलगाड्यांमधील वाळू ५०० रुपयांना विकली जात आहे. कोकणच्या किनाऱ्यांचा ऱ्हास केला जात आहे. (प्रतिनिधी)

गॉडफादर कोण?
किनाऱ्यावरील वाळू उपसा सुरू असताना काहीजणांनी त्याबाबत महसूलच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती. परंतु तक्रार केल्यानंतर महसूलचे अधिकारी कधीच त्या ठिकाणी तातडीने पोहोचत नाहीत, अशी ग्रामस्थांचीच तक्रार आहे. याबाबत कोणतीच कारवाई होत नसल्याने त्यांचे गॉडफादर आहेत तरी कोण, असा सवाल केला जात आहे.

Web Title: Mafiany shoved edges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.