महाडिक की साळवी; चर्चेत गुऱ्हाळ सुरूच

By admin | Published: March 20, 2017 11:51 PM2017-03-20T23:51:23+5:302017-03-20T23:51:23+5:30

जिल्हा परिषद अध्यक्ष : आज निवडणूक, संभ्रम कायम

Mahadik Ki Salvi; GURABAL in the discussion | महाडिक की साळवी; चर्चेत गुऱ्हाळ सुरूच

महाडिक की साळवी; चर्चेत गुऱ्हाळ सुरूच

Next


रत्नागिरी : स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीबाबत शिवसेनेत संभ्रमाचे वातावरण असल्याने अध्यक्ष पदाची निवडणूक काही तासांवर ठेपली तरी अंतिम नाव निश्चित झाले नाही. संगमेश्वर तालुक्यातील रचना महाडिक आणि लांजातील स्वरुपा साळवी यांच्या नावांमधील शर्यत सोमवारी रात्री उशिरापर्यंत कायम होती. उपाध्यक्षपदासाठी मात्र बाळकृष्ण जाधव यांच्या नावावर रात्री उशिराने शिक्कामोर्तब झाले.
एकूण ५५पैकी ३९ सदस्य शिवसेनेने निवडून आणून जिल्हा परिषदेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. यावेळी शिवसेनेने भाजपला लांब ठेवून एकहाती सत्ता मिळवली. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सभापतीपदे शिवसेनेकडेच राहणार आहेत. पुढील अडीच वर्षासाठी अध्यक्षपद सर्वसाधारण महिला सदस्यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे शिवसेनेच्या रचना महाडिक आणि स्वरुपा साळवी यांची नावे गेले काही दिवस चर्चेत आहेत.
अध्यक्षपदासाठी संगमेश्वर आणि लांजा यापैकी कोणत्या तालुक्याला संधी मिळते, याची आज दिवसभर चर्चा सुरु होती. जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक आणि लांजा-राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी अध्यक्षपदासाठी आपली राजकीय ताकद पणाला लावली आहे. रचना महाडिक २००९ - २०११ या कालावधीत अध्यक्ष होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये जिल्हा परिषद प्रशासनावर उत्तम पकड निर्माण केली होती. स्वरुपा साळवी यांनीही त्याच कालावधीत महिला व बालकल्याण समिती सभापतीपद सांभाळले होते. आता या दोघींच्या विशेषत: त्यांच्या पाठीराख्या नेत्यांच्या पक्षातील वजनाची चर्चा राजकीय गोटात सुरु आहे़
जिल्हा परिषदेतील गेल्या महिन्यातील स्थिती पाहता शिवसेना-भाजप यांच्यातील वाद तसेच अध्यक्ष तुकाराम गोलमडे यांचे आजारपण यामुळे सत्ता असतानाही प्रशासनावरील पकड ढिली झाल्याचे एकंदरीत स्थितीवरुन पुढे येत आहे. त्यासाठी प्रशासनावर वचक निर्माण करण्यासाठी महाडिक की, साळवी यापैकी जास्त प्रभावी कोण ठरु शकते, याचाही विचार पक्षस्तरावर सुरु आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला एका डॅशिंग अध्यक्षाची आवश्यकता असल्याचे काही सदस्यांचे म्हणणे आहे. रात्री उशिरापर्यंत शिवसेनेच्या सदस्यांची शासकीय विश्रामगृहात सुरु होती़ त्यामध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले़ मात्र, साळवी यांच्या नावाचीही चर्चा होती़ शेवटी महाडीक कि साळवी हे मातोश्रीवर ठरवले जाणार आहे.
उपाध्यक्षपदासाठीही मंगळवारी निवडणूक होत असून, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे बंधू चंद्रकांत कदम, चिपळूणचे बाळकृष्ण जाधव, मंडणगडचे संतोष गोवळे यांचीही नावे चर्चेत होती़ मात्र, उपाध्यक्ष पदासाठी जाधव यांचे नाव रात्री उशिरा निश्चित झाल्याचे समजते़ (शहर वार्ताहर)

Web Title: Mahadik Ki Salvi; GURABAL in the discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.