Maharashtra Assembly Election 2019 : नाणारच्या माध्यमातून विकासाची गंगा : जठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:27 PM2019-10-18T12:27:52+5:302019-10-18T12:30:31+5:30
नाणार प्रकल्पाच्या माध्यमातूनच कोकणात विकासाची गंगा आणणार आहोत. मात्र, गिर्ये, रामेश्वर गावांना हा प्रकल्प नको असेल तर ही दोन्ही गावे वगळणार असून विकासाचा रथ २५ वर्षे दौडतच राहणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात भाजप युग सुरू झाले असून २०२४ मध्ये कोकणात शत-प्रतिशत भाजप असेल, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.
देवगड : नाणार प्रकल्पाच्या माध्यमातूनच कोकणात विकासाची गंगा आणणार आहोत. मात्र, गिर्ये, रामेश्वर गावांना हा प्रकल्प नको असेल तर ही दोन्ही गावे वगळणार असून विकासाचा रथ २५ वर्षे दौडतच राहणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात भाजप युग सुरू झाले असून २०२४ मध्ये कोकणात शत-प्रतिशत भाजप असेल, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.
जामसंडे येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जठार बोलत होते. यावेळी माजी आमदार अॅड. अजित गोगटे, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, तालुकाध्यक्ष संतोष किंंजवडेकर, पंचायत समिती सदस्य सुनील पारकर, शहराध्यक्ष योगेश पाटकर, अनंत फडके आदी उपस्थित होते.
यावेळी जठार म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या कणकवली येथील जाहीर प्रचार सभेवेळी स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन होणार असून याचवेळी मेगाभरती होणार आहे. शक्ती व युक्तीचे मिलन यावेळी झालेले बघायला मिळेल. जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढताना दिसत असून तिन्ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजापुरात दरवर्षी जशी गंगा प्रकट होते तशी नाणार प्रकल्पाच्या माध्यमातून विकासाची गंगा कोकणात येणार आहे. गिर्ये, रामेश्वर गावांची संमती नसेल तर त्या गावांना वगळून रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगतची गावे जागा देण्यास तयार आहेत. त्यांचा यामध्ये समावेश करण्यात येईल, असे जठार यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, संदेश पारकर यांनी पक्षनिष्ठेबद्दल बोलू नये. त्यांच्याजवळ पक्षही नाही व निष्ठाही नाही. पक्षनिष्ठा विनोद तावडेंकडून शिकावी. त्यांना पक्षाने तिकीट नाकारूनही भाजप उमेदवाराच्या प्रचाराला ते आले. पारकर यांना शत्रू व मित्र ओळखता आले नाहीत.
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने कपटाने त्यांचा पराभव केला. पारकर यांच्या सांगण्यावरूनच आम्ही युती केली होती. तो पराभव पारकर यांचा नव्हता, तर भाजपाचा होता. त्याचा बदला घेण्यासाठी भाजपाचे शिलेदार तयार आहेत.
या निवडणुकीत युती असतानाही कणकवली मतदारसंघात शिवसेनेने उमेदवाराला ए आणि बी फॉर्म दिला. अशा कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. नीतेश राणे यांना उमेदवारी देणे हा पक्षाध्यक्षांचा आदेश होता. आम्ही त्याची फक्त अंमलबजावणी केली. जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. पक्ष हाऊसफुल्ल होऊ लागला आहे. तर शिवसेनेमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षप्रमुखांना एका सभेऐवजी जिल्ह्यात तीन सभा घ्याव्या लागत आहेत.
राजन तेली बंडखोर नाहीत. ते अपक्ष उमेदवार आहेत. कणकवली विधानसभेमध्ये शिवसेनेने ए व बी फॉर्म देऊन
युतीधर्म तोडला. उलट आम्ही कोणालाच ए व बी फॉर्म दिला नव्हता. कणकवलीतील अॅक्शनची कुडाळ व सावंतवाडी ही रिअॅक्शन असून सतीश सावंत हे बेकायदेशीर उमेदवार आहेत, असा हल्लाबोल जठार यांनी केला. सदाशिव ओगले, सुनील पारकर हे भाजपासोबतच आहेत, असे जठार यांनी यावेळी सांगितले.
साळसकर शिवसेनेची मते विकणारे : गोगटे
मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्षाला वाटले तुम्ही काम करावे. पक्षाने आदेश दिला आणि मी कामाला सुरुवात केली. त्यामुळे शिवसेना उपजिल्हाप्रमुख साळसकरांच्या दाखल्यांची गरज नाही. प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेची मते लिलाव पध्दतीने विकणे ही साळसकर यांची खासियत आहे. गत निवडणुकीत २५ हजार मते शिवसेनेची आहेत असे म्हणणाऱ्या शिवसेनेला फक्त १२ हजार मते मिळाली. उरलेली मते गेली कुठे? या निवडणुकीतही शिवसेनेची मते विकली तर जाणार नाहीत ना, अशी शंकाही गोगटे यांनी व्यक्त केली.
शिवसेनेवर घणाघात
शिवसेनेला खूप मोठी संधी कोकणातील जनतेने दिली. खासदार, आमदार, पालकमंत्री ही पदे शिवसेनेला दिली. मात्र, सातत्याने विकास व विकास प्रकल्पांना आडवे जाण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या मांजरांनी केला. आरोग्यमंत्री देवगड तालुक्याचे सुपुत्र असूनही आरोग्याचा प्रश्न सुटला नाही. उद्योग न आणणारे निरूद्योगी उद्योगमंत्री फक्त भाषण करून जातात. गृह व अर्थराज्यमंत्री जिल्ह्यातील असूनही आर्थिक सुबत्ता आली नाही, अशी खिल्ली जठार यांनी उडविली.