"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 07:46 PM2024-11-16T19:46:19+5:302024-11-16T19:55:44+5:30

सावंतवाडीत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Deepak Kesarkar has responded to Uddhav Thackeray criticism in Sawantwadi | "साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार

"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला चार दिवस उरले असताना राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी कोकण दौऱ्यात महायुतीच्या उमेदवारांना लक्ष्य केलं होतं. मंत्री दीपक केसरकर यांच्यावरही उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली होती. आता दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

सावंतवाडी मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग येथे गेले होते. यावेळी त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली. दीपक केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गात चांगले होणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. दीपक केसरकर हे अदानीच्या गोल्फ कोर्ससाठी जागा शोधत होते, असा आरोप यावेळी उद्धव ठाकरेंनी केला. यावेळी साईबाबांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी केसरकरांना लक्ष्य केलं.

उद्धव ठाकरेंनी केलेल्यी टीकेवर दीपक केसरकर यांनी भाष्य केलं आहे. "गेल्या १५ वर्षात मी काय काम केलं यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. पण ते सोडा गेल्या ५ वर्षात २५०० कोटी रुपयांचा निधी आणला आहे. उद्धव ठाकरे सावंतवाडीत येऊन साई बाबांबद्दल बोलतात. मात्र साईबाबांनी आशीर्वाद दिले म्हणूनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. अन्यथा उद्धव ठाकरे केव्हाच मुख्यमंत्री झाले नसते," असा टोला दीपक केसरकरांनी लगावला.

"नारायण राणे यांनी मला पहिल्यांदा आमदार केलं. विधानपरिषदेत मी आठ वेळा बजेट सादर केल्याचे केसरकर म्हणाले. जी युती बाळासाहेबांनी निर्माण केली, ती युती सिंधुदुर्गात मोडायचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. मी स्वतः बजेट सादर करताना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला निधी दिला, मात्र उद्धव ठाकरे म्हणतात मी निधी दिला," असेही दीपक केसरकर म्हणाले.  
 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

"अदानीचे दलाल सबका मालिक अदानी, सब कुछ अदानी असे म्हणतात. साईबाबा काय सांगत होते, सबका मालिक एक आणि हे म्हणतात सबका आलिक अदानी आहे. माझ्या कोकणचे आदानीकरण आपण कदापीही होऊ देणार नाही," असं उद्धव ठाकरेंनी सावंतवाडीत म्हटलं होतं.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Deepak Kesarkar has responded to Uddhav Thackeray criticism in Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.