तुमची ओळख आमच्यामुळे, शिवसैनिकांचे राणेंवर जोरदार टीकास्त्र
By अनंत खं.जाधव | Published: November 1, 2024 04:08 PM2024-11-01T16:08:59+5:302024-11-01T16:10:24+5:30
सावंतवाडी : १९९० साली माजी मुख्यमंत्री नारायण राणे मुंबईमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आणि त्यांनी कणकवली मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यावेळी ...
सावंतवाडी : १९९० साली माजी मुख्यमंत्री नारायण राणे मुंबईमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आणि त्यांनी कणकवली मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांच्या सोबत असलेले तत्कालीन शिवसैनिकांनी एकत्र येत राणेंवर जोरदार टीकास्त्र चढवले. आम्हीच राणेंना सिंधुदुर्ग जिल्हा दाखवला असा दावा ही या नेत्यांनी केला असून, आम्ही आता कुठेही जाणार नाही असा विश्वास गौरीशंकर खोत, परशुराम उपरकर, सतीश सावंत यांनी दिला.
उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शुक्रवारी सावंतवाडीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी आमदार राजन तेली, परशुराम उपरकर, गौरीशंकर खोत, सतिश सावंत, संजय पडते, बबन साळगावकर, उमेश कोरगावकर, मंदार शिरसाट, शब्बीर मणियार उपस्थित होते.
उपरकर व खोत म्हणाले, १९९० साली नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठवले. त्यानंतर त्यांना कणकवली मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. यावेळी मतदारसंघातील प्रत्येक घर आणि घर आम्ही दाखवले. २२ दिवसात राणेंना निवडून आणले.
'..ते जनतेला सांगण्याची वेळ आली'
पण आज ते आम्हा सगळ्यांना हे दिले ते दिले असे सांगून टीका करत उणीदूणी काढत आहेत. म्हणूनच खरे काय हे जनतेला कळले पाहिजे म्हणूनच सर्व इतिहास सांगितला. राणे हा इतिहास खोटा ठरवू शकत नाहीत. ते आपण बाळासाहेबांमुळे घडलो सांगतात, पण आम्ही यांना जिल्ह्याची ओळख करून दिली हे कुठेतरी विसरतात ते जनतेला सांगण्याची वेळ आली आहे.
जनतेने राणेंचा स्वार्थ ओळखावा
केसरकर यांनी राणेंवर टोकाची टीका केली ते चालतात. पण ज्यांनी मदत केली त्यांना हे पाण्यात बघतात. आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेने राणे याचा स्वार्थ ओळखला पाहिजे असे आवाहन ही उपस्थित नेत्यांनी केले.