Vidhan Sabha Election 2024: ईव्हीएमवर नजर ठेवणार ‘जीपीएस’, अनुचित प्रकार टाळता येणार
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 9, 2024 06:37 PM2024-11-09T18:37:54+5:302024-11-09T18:44:04+5:30
मतदानयंत्राची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बसविणार यंत्रणा
महेश सरनाईक
सिंधुदुर्ग : विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी वापरण्यात येणारे मतदान यंत्र अर्थात ईव्हीएमवर करडी नजर ठेवण्यासाठी यंत्र वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस (ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम) बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
निवडणूक यंत्रणेत यापूर्वी जीपीएस प्रणालीचा वापर केला जात नव्हता. तो यंदा लोकसभा निवडणुकीपासून केला जात आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आता थेट नियंत्रण ठेवता येणे शक्य झाले आहे. एसटी महामंडळावरील सुसज्ज बसेस या ईव्हीएम व कर्मचाऱ्यांसाठी घेतल्या जाणार आहेत.
प्रशासनाने निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठीदेखील विविध उपक्रम राबविले जात आहेत. जास्तीत जास्त मतदारांना मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. विविध चित्ररथांव्दारे जनजागृतीची मोहीम राबविण्यात येत आहे. दुचाकी रॅली, विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढून मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी प्रशासन सतर्क आहे.
मशिनमध्ये बिघाड झाल्यास अनुचित प्रकार टाळता येणे शक्य
जिल्हा प्रशासनाकडून एक स्वतंत्र जीपीएस बसविले जाणार आहे. रस्त्यात जाताना किवा येताना बस बंद झाली किवा मशीनमध्ये बिघाड झाला तर यामुळे अनुचित प्रकार टाळता येणे सहज शक्य होणार आहे. जीपीएसमुळे तत्काळ मदत होते. याचा फायदा प्रशासनाला होणार असल्याचे सांगण्यात आले.
कंट्रोल रूम तयार होणार
- जीपीएससाठी स्वतंत्र कंट्रोल रूम तयार केले जाणार आहे. कंट्रोल रूमचा कंट्रोल कुणाकडे दिला जाणार, याबाबतच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस व आरटीओ यांची बैठक होणार आहे.
- यामध्ये बसची संख्या, जीपीएस व कंट्रोल रूम यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती आहे.