दीपक केसरकर राजकारणातले सचिन तेंडुलकर, सावंतवाडीचा कप जिंकतील; मुख्यमंत्र्यांचा विश्वास
By अनंत खं.जाधव | Published: November 16, 2024 06:54 PM2024-11-16T18:54:44+5:302024-11-16T18:57:59+5:30
''..त्यामुळेच मी उठाव केला''
सावंतवाडी : कोकण आणि शिवसेनाप्रमुख यांचे वेगळे नाते होते. कोकणाने शिवसेनाप्रमुखांना भरभरून प्रेम दिले. त्यामुळेच आम्ही खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. मंत्री दीपक केसरकर यांनी मला खंबीर साथ दिली. गुवाहाटीत त्यांनी घेतलेली भूमिका ही राजकारणातील सचिन तेंडुलकरसारखी होती. त्यामुळे केसरकर नक्कीच विजयाचा चौकार मारतील आणि सावंतवाडीचा कप जिंकून आणतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. सावंतवाडीत महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ येथील गांधी चौकात शनिवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी खासदार नारायण राणे, कुडाळ मालवणचे उमेदवार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, दत्ता सामंत, लखमसावंत भोसले, श्वेता कोरगावकर, संजू परब, संजय आंग्रे, संदीप कुडतरकर, काका कुडाळकर, केरळ येथील हरीलाल शर्मा आदी उपस्थित होते.
..त्यामुळेच मी उठाव केला - शिंदे
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी जरी सीएम असलो, तरी सर्व सामान्य माणूस आहे. गोरगरीब जनतेचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून काम करत राहिलो. याचा मला अभिमान आहे. अडीच वर्षांपूर्वी मी जेव्हा सत्तेच्या विरोधात उठाव केला तेव्हा माझ्यावर अनेक आरोप झाले. पण मी घाबरलो नाही, कारण मला शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे न्यायचे होते. 2019 मध्ये महाराष्ट्राने युतीला कौल दिला होता. पण जनतेचा अपमान करत काहींनी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसशी युती केली आणि जनतेचा अपमान केला. पण हे मला मान्य नव्हते त्यामुळेच मी हा उठाव केल्याचे शिंदे यांनी सांगितले.
बदनामी करणारे आता तीन हजार देऊ म्हणून सांगत आहेत
गेल्या अडीच वर्षात सर्व बंद प्रकल्प पुन्हा सुरू केले. योजना आणल्या त्यातून गोरगरीब जनतेला न्याय दिला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही तर एवढी नावारूपास आली विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली. सुरूवातीला ही योजना बंद होणार म्हणून बदनामी करणारे आता तीन हजार रूपये देऊ म्हणून सांगत आहेत अशी जोरदार टीका महाविकास आघाडीवर केली.
केसरकर चक्रव्यूह भेदतात
दीपक केसरकर यांचा गेली पंधरा वर्षे कोणीही पराभव करू शकले नाहीत. त्यांनी विकास कामातून नेहमीच विरोधकांना उत्तर दिले. अनेक संघर्ष पाहिले पण कुठल्या चक्रव्यूहात फसले नाहीत. त्यांचा कधीही अभिमन्यू झाला नाही. ते व्यवस्थित चक्रव्यूह भेटून बाहेर पडतात असे गौरवउद्गार शिंदे यांनी केसरकर यांच्या बद्दल काढले.
हलक्यात घेऊ नका, तुमचा टांगा पलटी केला
मला दहा दिवसात जेलमध्ये टाकणार असे म्हणतात पण मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका आणि हलक्यात पण घेऊ नका. अडीच वर्षांपूर्वी तुमचा टांगा पलटी केला असे सांगत मी संघर्षातून वर आलेलो आहे. त्यामुळे जेलची भाषा माझ्यासाठी नवीन नाही असे सांगत उद्धवसेनेवर नाव न घेता जोरदार टीका केली तसेच तुम्ही किती ही टिका करा मी माझ्या कामाने उत्तर देईन असे शिंदे म्हणाले.