आमदार वैभव नाईक यांची ३२.५८ कोटींची संपत्ती, नावावर पाच प्रलंबित फौजदारी खटले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 07:03 PM2024-10-26T19:03:22+5:302024-10-26T19:03:59+5:30
कुडाळ : कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी उद्धवसेनेकडून आगामी विधानसभेसाठी निवडणूक अर्ज गुरुवारी दाखल केला. यामध्ये त्यांनी ...
कुडाळ : कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी उद्धवसेनेकडून आगामी विधानसभेसाठी निवडणूक अर्ज गुरुवारी दाखल केला. यामध्ये त्यांनी जंगम व स्थावर अशी एकूण ३२ कोटी ५८ लाख ३२ हजार ५९९ रुपयांची संपत्ती नमूद केली आहे. त्यांच्यावर जिल्ह्यातील तीन पोलिस ठाण्यात पाच फौजदारी खटले प्रलंबित आहेत, अशी माहिती कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. गुरुवारी या प्रक्रियेतील शुभारंभ आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. दाखल केलेल्या अर्जात त्यांनी आपल्या स्थावर व जंगल मालमत्तेचे विवरण दाखवले आहे.
जंगम मालमत्तेमध्ये..
यानुसार जंगम मालमत्तेमध्ये त्यांनी स्वतःच्या नावे ७ कोटी ३१ लाख २ हजार २१५ रू. तर पत्नीच्या नावे ३ कोटी ९२ लाख ८३ हजार ८४ रू. तर सामायिक मालमत्तेपैकी ९ लाख ८६ हजार ७५४ रू एवढ्या मालमत्तेचे विवरण दाखवले आहे. यामध्ये फॉर्च्युनर कार, स्कॉर्पिओ, जेसीबी या मालमत्तेचे ४३ लाख ३० हजार ९२४ रू. त्यांच्याकडे स्वतःकडे २८१ ग्रॅम सोने असून त्याची किंमत २२ लाख ६२ हजार ८५८ रू. तर पत्नीकडे ४११ ग्रॅम सोने असून त्याची किंमत ३४ लाख ९७ हजार १२२ रुपये आहे. त्यांनी पत्नी व स्वतःचे नावाने ९१ लाख ७० हजार ३८१ रू कर्ज घेतल्याचे अर्जात नमूद आहेत.
स्थावर मालमत्तेमध्ये..
स्थावर मालमत्तेमध्ये स्वतःच्या नावे शेतजमीन, घर अशा स्वरूपाच्या मालमत्तेचे ११ कोटी ३९ लाख, ८० हजार ३०० रू तर पत्नीचे नावे २ कोटी ५२ लाख ५१ हजार, तर सामायिक मालमत्तेत ७ कोटी ६० लाख रुपये एवढी मालमत्ता आहे.
पाच प्रलंबित फौजदारी खटले
आमदार वैभव नाईक यांच्यावर एकूण पाच प्रलंबित फौजदारी खटले आहेत. यामध्ये कुडाळ पोलिस ठाणे येथे ३, कणकवली पोलिस ठाण्यात १ तर मालवण पोलिस ठाण्यात एक अशा ५ फौजदारी खटल्यांचा समावेश आहे, अशी माहिती कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.