कणकवलीतून नितेश राणे हॅट्ट्रिक साधणार का ?, उद्धवसेनेचा उमेदवारच ठरेना
By सुधीर राणे | Published: October 24, 2024 01:05 PM2024-10-24T13:05:38+5:302024-10-24T13:06:38+5:30
नागरिकांमध्ये औत्सुक्य; कणकवली विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा रिंगणात
सुधीर राणे
कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदार नितेश राणे सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप निश्चित नसला तरी तो कोण असेल? नितेश राणे यांना यावेळी आमदारकीची हॅटट्रिक साधता येणार का? याबाबत मतदारसंघात तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
कणकवली विधानसभा मतदारसंघात कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तीन तालुक्यांचा समावेश होतो. गेल्या अनेक निवडणुकांचा इतिहास पाहता, कणकवली हा भाग नारायण राणे यांचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे २०१४ मध्ये प्रथमच कणकवली मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढणाऱ्या नितेश राणे यांना ७४ हजार ७१५ मते मिळाली होती. तर भाजपकडून लढणारे प्रमोद जठार यांना ४८ हजार ८३६, शिवसेनेचे सुभाष मयेकर यांना १२ हजार ८६३, राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल रावराणे यांना ८ हजार १९६ मते व काँग्रेसचे बंडखोर उमेदवार माजी आमदार विजय सावंत यांना ७ हजार मते मिळाली होती. त्यावेळी नितेश राणे विजयी झाले होते.
२०१९ मध्ये राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात युती असताना कणकवली मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला होता. मात्र, या मतदारसंघात भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेने सतीश सावंत यांना अधिकृत उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांच्यासाठी मतदारसंघात सभा घेऊन ताकद दिली होती. तर राणेंशी राजकीय शत्रुत्व असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सतीश सावंत यांच्यासाठी कणकवलीत खास प्रचार सभा घेतली होती. त्यावेळी नितेश राणे ८४,५०४ मते मिळवून विजयी झाले होते.
शिवसेनेचे सतीश सावंत यांना ५६,३८८, काँग्रेसचे सुशील राणे यांना ३,३५५, मनसेचे राजन दाभोलकर यांना १,४२१, बसपाचे विजय साळकर यांना ४१६, वंचित आघाडीच्या मनाली वंजारे यांना २,०५४, तर बहुजन मुक्ती पार्टीचे वसंत भोसले यांना ३७८ मते मिळाली होती.
आता २०२४ मध्ये नितेश राणे पुन्हा या मतदारसंघातून भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवत आपले नशीब अजमावणार आहेत.
यांची नावे चर्चेत!
कणकवली मतदारसंघातून आमदार नितेश राणे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेचे संदेश पारकर, अतुल रावराणे, सुशांत नाईक हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवार निश्चित झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवाराला मतदारांपर्यंत पोहोचायला कमी दिवस मिळणार आहेत.
कणकवली विधानसभा मतदारसंघ!
- पुरुष- १,१३,९७५.
- महिला- १,१६,७६५.
- एकूण- २,२९,५९२ मतदार.
उद्धवसेनेचा उमेदवारच ठरेना !
२०१९ च्या विधानसभेचा विचार केला, तर भाजपचे आमदार नितेश राणे यांना २८ हजारांचे मताधिक्य होते. २०२४ ची लोकसभा निवडणुक नारायण राणे यांनी लढविली.त्यावेळी या मताधिक्यात १४ हजारांची वाढ झाली. उद्धवसेनेच्यावतीने या मतदारसंघासाठी पक्ष नेतृत्वाने उमेदवार कोण याबाबत संभ्रमावस्था ठेवली आहे.