शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
By अनंत खं.जाधव | Published: November 5, 2024 04:34 PM2024-11-05T16:34:48+5:302024-11-05T16:36:08+5:30
सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेला लाथ मारून बाजूला गेले. सत्ता कोण सोडत नाही पण ते त्यांनी धारिष्ट्य दाखवले. ...
सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेला लाथ मारून बाजूला गेले. सत्ता कोण सोडत नाही पण ते त्यांनी धारिष्ट्य दाखवले. शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे पण त्याच्या विचाराचे वारस शिंदे हेच आहेत. म्हणूनच लोकांनी आमच्यावर भरभरून प्रेम केले. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्या बरोबर जनता राहत नाही हे लोकसभा निवडणुकीत बघितलं आहे असे जोरदार प्रत्युत्तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना दिले.
राज ठाकरे यांनी शिवसेना नाव व चिन्ह ही बाळासाहेबांची मालमत्ता आहे. एकनाथ शिंदेंची नाही अशी टीका केली होती. त्याला केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. ते काय बोलले यावर माझ्यासारख्या छोट्या माणसाने बोलणे योग्य नाही. पण एकनाथ शिंदे यांनी सत्तेतून बाहेर गेले. लोक सत्ता सोडायला तयार नसतात. पण त्यांनी धाडस करून दाखवले. हा विचार वारसातूनच येत असतात.
..अन् युवराज काँग्रेसच्या नेत्यांसोबत गळाभेट घेतात
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत तत्कालीन काँग्रेसचे मंत्री अपशब्द बोलले त्यांना बाळासाहेबांनी मुंबईमध्ये येऊ दिले नाही. पण आज याच काँग्रेसच्या नेत्यांसोबत युवराज गळाभेट घेतात. हे येथील जनता सहन करणार नाही असेही केसरकर म्हणाले.
शरद पवार यांच्या निवृत्तीच्या संकेतावरही केले भाष्य
खासदार शरद पवार यांनी दिलेल्या निवृत्तीच्या संकेतावरही मंत्री केसरकर यांनी भाष्य केले. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत त्यांच्याबाबत मी बोलणे योग्य नाही. पण त्यांनी यापूर्वीही निवृत्तीबाबत निर्णय घेतला होता असे ते केसरकर म्हणाले.
..त्याची चौकशी करावी लागेल
सावंतवाडी मतदारसंघात सध्या काही अप्रवृत्ती आलेल्या आहेत त्यांना येथील जनतेने वेळीच घरी पाठवणे गरजेचे आहे. काही जणांवर जमीन घोटाळ्यांचे आरोप आहेत. अशांवर पोलिसांनी अद्याप पर्यंत कशी काय कारवाई केली नाही याची चौकशी करावी लागेल. जमिनीचे मोठे घोटाळे आहेत पोलिसांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हा शाखेकडे पाठवले पाहिजे होते पण तसे झाले नाही. सध्या निवडणुकीचा कालावधी आहे. त्यामुळे यावर आम्ही खोलात जात नाही पण निवडणूक संपतात याबाबत चौकशी करण्याची मागणी करू असेही मंत्री केसरकर म्हणाले.