Vidhan Sabha Election 2024: सिंधुदुर्गमध्ये महायुतीचाच डंका; राणेंची पुन्हा एकदा ठाकरेंवर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 03:58 PM2024-11-24T15:58:21+5:302024-11-24T15:59:03+5:30

शिंदेसेनेची दोन जागांवर बाजी, भाजपकडून बालेकिल्ला मजबूत; वैभव नाईक यांना धक्का

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The Mahayuti gave a shock to the Uddhav Sena by winning three seats in the Legislative Assembly in Sindhudurg district | Vidhan Sabha Election 2024: सिंधुदुर्गमध्ये महायुतीचाच डंका; राणेंची पुन्हा एकदा ठाकरेंवर मात

Vidhan Sabha Election 2024: सिंधुदुर्गमध्ये महायुतीचाच डंका; राणेंची पुन्हा एकदा ठाकरेंवर मात

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील विधानसभेच्या तिन्ही जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत महायुतीने लोकसभेच्या विजयाची पुनरावृत्ती करत उद्धवसेनेला चारीमुंड्या चित केले आहे. खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र आमदार नीतेश राणे (कणकवली) भाजपकडून हॅटट्रिक तर माजी खासदार नीलेश राणे (कुडाळ) यांनी विधानसभेत एंट्री केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदारांनी नारायण राणे कुटुंबीयांवर पुन्हा विश्वास दाखवत दोन्ही भावांना विजयी केले आहे. सावंतवाडी मतदारसंघातून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिंदेसेनेकडून विजयाचा चौकार ठोकला आहे.

नीलेश राणेंची एंट्री

कुडाळ मतदारसंघातून २०१४ साली नारायण राणे यांचा पराभव करून जायंट किलर ठरत शिवसेनेकडून वैभव नाईक पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी २०१९ मध्येही विजय मिळविला होता. हॅटट्रिक करण्यासाठी रिंगणात असलेल्या वैभव नाईक यांच्या विजयाचा वारू रोखला आहे. नीलेश राणे यांनी शिंदेसेनेकडून विजयाचे धनुष्य पेलवत विधानसभेत पहिल्यांदा एंट्री केली आहे.

नितेश राणेंना मिळाले सर्वाधिक मताधिक्य

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक नोंदविली आहे. यावेळी त्यांनी उद्धवसेनेचे उमेदवार संदेश पारकर यांचा तब्बल ५८००७ मतांनी पराभव करत कोकणातील सर्वाधिक मताधिक्य मिळविले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ते भाजपचे एकमेव आमदार आहेत.

नारायण राणेंवर विश्वास, केसरकरांना साथ

लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गमधू्न भाजपचे खासदार म्हणून विजय मिळवत कमबॅक केली होती. त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत झाली. तर यावेळी दीपक केसरकर यांना राणेंची साथ लाभल्याने सावंतवाडी मतदारसंघात बंडखोरी होऊनदेखील केसरकरांनी तब्बल ३९,८९९ मतांनी उद्धवसेनेच्या राजन तेलींचा सलग तिसऱ्यांदा पराभव केला.

राणेंची पुन्हा एकदा ठाकरेंवर मात

सिंधुदुर्गातील राजकीय लढाई राणे विरुद्ध ठाकरे अशीच असते. उद्धव ठाकरेंनी स्वत: जिल्ह्यात तीन सभा घेतल्या. आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांनी सभा घेऊन राणे कुटुंबीयांना लक्ष केले. मात्र, त्याचे रूपांतर नाईक यांना मते मिळविण्यासाठी झाले नाही. परिणामी, राणेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर मात करत सिंधुदुर्ग हा आपलाच बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले.

सिंधुदुर्गातील तीन मतदारसंघ निकाल

कणकवली मतदारसंघ
विजयी उमेदवार : नितेश राणे
पक्ष : भाजप,
मिळालेली मते : १, ०८, ३६९.

पराभूत उमेदवार : संदेश पारकर
पक्ष : उद्धवसेना
मिळालेली मते : ५०, ३६२.

कुडाळ मतदारसंघ
विजयी उमेदवार : नीलेश राणे
पक्ष : शिंदेसेना
मिळालेली मते : ८१, ६५९

पराभूत उमेदवार : वैभव नाईक
पक्ष : उद्धवसेना
मिळालेली मते : ७३,४८३

सावंतवाडी मतदारसंघ
विजयी उमेदवार : दीपक केसरकर
पक्ष : शिंदेसेना
मिळालेली मते : ८१००८

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The Mahayuti gave a shock to the Uddhav Sena by winning three seats in the Legislative Assembly in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.