..तर बैलगाडीतूनच करावा लागणार प्रचार; निवडणूक विभागाने निश्चित केले वाहनांचे दर

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 26, 2024 06:56 PM2024-10-26T18:56:41+5:302024-10-26T18:57:28+5:30

महेश सरनाईक सिंधुदुर्ग : उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार करणे आवश्यक आहे. प्रचारासाठी प्रामुख्याने विविध प्रकारच्या वाहनांचा उपयोग केला जातो. ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 then campaigning will have to be done by bullock cart only; The rates of vehicles are fixed by the Election Department | ..तर बैलगाडीतूनच करावा लागणार प्रचार; निवडणूक विभागाने निश्चित केले वाहनांचे दर

संग्रहित छाया

महेश सरनाईक

सिंधुदुर्ग : उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार करणे आवश्यक आहे. प्रचारासाठी प्रामुख्याने विविध प्रकारच्या वाहनांचा उपयोग केला जातो. कोणत्या वाहनाचे दर दिवसाला किती रूपये भाडे राहील हे निवडणूक विभागाने निश्चित केले आहे. त्यानुसार टाटा सुमो, बोलेरो, काळी-पिवळी, जीप यांचे इंधनासह प्रति दिवसाचे भाडे ३ हजार ८०० रूपये तर बैलगाडी, घोडागाडी प्रतितास २ रूपये दर ठरविण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक विभाग याकडे लक्ष ठेवणार असून त्यानुसार उमेदवारांचा खर्च निश्चित केला जाणार आहे.

उमेदवाराला ४० लाख रूपयांची मर्यादा

निवडणुकीदरम्यान मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवाराला प्रचार करावा लागतो. यासाठी वाहने भाड्याने घेऊन त्यावर ध्वनिक्षेपक लावला जातो. तसेच बॅनर, पोस्टर व वाहनाला बॅनर, पोस्टर बांधून उमेदवार प्रचार करतात. निवडणुकीदरम्यान, खर्चाची मर्यादा पाळणे उमेदवाराला आवश्यक आहे. यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत ४० लाख रूपयांची मर्यादा देण्यात आली आहे.

दर दिवशीचा खर्च सादर करण्याची अट

दर दिवशीचा खर्च उमेदवाराला निवडणूक विभागाकडे सादर करावा लागतो. खर्चाची मर्यादा ओलांडल्यास निवडून येवूनही उमेदवारांचे पद धोक्यात येण्याची शक्यता अधिक आहे. निवडणूक खर्चाचा हिशेब जुळवताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी निवडणूक विभागाने जवळपास सर्वच प्रकारच्या वाहनांचे दर ठरवले आहेत. सोबतच इंधनासह व इंधनाशिवाय असेसुद्धा वर्गीकरण केले आहे. त्यानुसार निवडणूक खर्च विभागाला सादर करणे आवश्यक आहे.

४० सीटर प्रवासी वाहनाचे भाडे दहा हजार रूपये

  • ४० सीटर प्रवासी वाहनाचे भाडे दिवसाला ७ हजार ७०० रूपये तर इंधनासह १० हजार ४०० रूपये ठरविण्यात आले आहे.
  • १८ सीटर वाहनासाठी दिवसाचे इंधनाशिवाय भाडे ४ हजार ६२५ रूपये तर इंधनासोबत ५ हजार ७६० रूपये ठरविले आहे. ५० लीटर वाहनाचे इंधनासोबतचे भाडे २२ हजार ९५० रूपये ठरविण्यात आले आहे.


सायकल रिक्षा प्रतितास २ रूपये कुठे मिळते साहेब ?

  • काही उमेदवार शहरात सायकल रिक्षाच्या माध्यमातून प्रचार करतात. त्यासाठी इंधन लागत नसल्याने त्याचे भाडे कमीच ठेवण्यात आले आहे.
  • निवडणूक विभागाने सायकल, रिक्षा, घोडागाडी, बैलगाडी यासाठी प्रतितास केवळ २ रूपये भाडे ठरविले आहे. ४०० रूपये दिवसाची मजुरी दिल्याशिवाय मजूर मिळत नाही. अशास्थितीत सायकल, सायकल रिक्षा, बैलगाडी केवळ दोन रूपये प्रतितास या दराने मिळणार काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


मालवाहू वाहनासाठी पाच हजार रूपये

  • मालवाहू हलक्या वाहनाचे इंधनाचे भाडे ५ हजार २६० रूपये ठरविण्यात आले आहे. १० चाकी वाहन असल्यास १२ हजार ८०० रूपये, १२ ते १४ चाकी वाहन १३ हजार ६०० रूपये, १६ चाकी वाहनाचे भाडे २५ हजार ७०० रूपये ठरविले आहेत. त्यानुसार निवडणूक खर्च सादर करावा लागणार आहे.
  • कितीही रूपये दिले तरी निवडणूक विभागाकडे खर्च सादर करतेवेळी निवडणूक विभागाने ठरवून दिलेल्या दरानेच खर्च सादर करायचा असतो.


ऑटोरिक्षा एक हजार रूपये दिवस

ऑटोरिक्षाच्या माध्यमातूनही प्रचार केला जातो. निवडणूक विभागाने इंधनासह ऑटोरिक्षाचा दर प्रतिदिवस एक हजार रूपये, सायकल रिक्षा प्रतितास २ रूपये, दुचाकी प्रतितास २० रूपये, ट्रॉलीसोबत ट्रॅक्टर प्रतिदिवस ३ हजार रूपये दर ठरविला आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 then campaigning will have to be done by bullock cart only; The rates of vehicles are fixed by the Election Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.