उद्धव ठाकरेंचा सोडा पहिला आमचा ताफा अडवून दाखवा, विनायक राऊतांचे राणेंना आव्हान
By अनंत खं.जाधव | Published: November 11, 2024 01:04 PM2024-11-11T13:04:17+5:302024-11-11T13:05:48+5:30
राणे खासदार झाले अन् विमानळ बंद पडले
सावंतवाडी : शिवसेना उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाड्याचा ताफा अडवण्यापूर्वी हिम्मत असेल तर आमच्या गाड्याचा ताफा आडवा मग उद्धवसेनेची ताकद तुम्हाला दाखवू असे खुले आव्हान उध्दव सेनेचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी दिले. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राणे खासदार झाले आणि चिपी विमानतळ बंद पडले असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
राऊत म्हणाले, नारायण राणे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिले काम चिपी विमानतळावरून विमानाचे उड्डाण बंद झाले असे निष्क्रिय खासदार आहेत. हे विमानतळ पुन्हा सुरू व्हावे म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीत मोठ्याप्रमाणात पैशाचा वापर झाला म्हणूनच आपणास पराभव पत्करावा लागला. पण आता यांना जनता धडा शिकवेल. उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर राणे त्यांची गाडी अडवू म्हणतात पण त्यांची गाडी सोडा आमचीच गाडी अडवून दाखवा असे खुले आव्हान राऊत यांनी दिले.
पंधरा वर्षे थापा मारुन सावंतवाडी मतदार संघातील लोकांना उल्लू बनविणार्या दीपक केसरकरांपेक्षा राजन तेली उजवे आहेत. जनता दीपक केसरकरांना कंटाळली आहे. त्यांची खोटी आश्वासने, थापेबाजपणा आता लोकांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे काही झाले तरी आता आम्ही केसरकरांना मदत करणार नाही, असा चंग येथील जनतेने बांधला असल्याचे राऊत म्हणाले. पत्रकार परिषदेस माजी मंत्री प्रविण भोसले, राजन तेली, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, उपनेत्या जान्हवी सावंत, रूपेश राऊळ, मायकल डीसोझा, सागर नाणोसकर आदी. उपस्थित होते.