Maharashtra Election 2019:भाजपा 'निष्ठावंतांचे' बंडाचे निशाण; नीतेश राणेंविरोधात सर्वसामान्य उमेदवार देण्याचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 05:22 PM2019-10-03T17:22:35+5:302019-10-03T17:41:06+5:30
कणकवली विधानसभा 2019- भाजपाने कणकवली मतदारसंघातून नितेश राणेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने मतदारसंघातील भाजपचे निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते गुरुवारी एकवटल्याचे दिसून आले.
वैभववाडी: भाजपाने कणकवली मतदारसंघातून नितेश राणेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने मतदारसंघातील भाजपचे निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते गुरुवारी एकवटल्याचे दिसून आले. त्यांनी भाजप नेतृत्वाच्या एकांगी निर्णयाविरोध बंडाचे निशाण फडकावत भाजपा नेते अतुल रावराणे यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीत 'आम्ही कोणत्याही परिस्थतीत नीतेश राणेंचे काम करणार नाही', अशी ठाम भूमिका घेत राणेंच्या विरोधात सर्वसामान्य उमेदवार देण्याचा निर्धार व्यक्त केला.
कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदार नीतेश राणे यांना उमेदवारी देण्याचे भाजपाने निश्चित केले आहे. त्यामुळे नीतेश राणे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत कणकवली येथे पक्षाचे सदस्यत्व स्विकारले. पक्ष नेतृत्वाच्या या निर्णयाच्याविरोधात मतदारसंघातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी अतुल रावराणे, सदा ओगले यांच्या नेतृत्वाखाली एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले. या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रावराणे यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत अतुल रावराणे आणि सदा ओगले यांच्याकडे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परखडपणे मते मांडली.
बैठकीत 'ज्यांच्या विरोधात गेली लढलो त्यांचे काम कदापि करणार नाही. पक्षावर आमचा अजिबात रोष नाही. परंतु, आम्ही ज्या प्रवृत्तीशी लढत आलो. त्याच प्रवृत्तीला पक्षात घेऊन उमेदवारी देणे हा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे. तो आम्ही कदापि सहन करणार नाही. मात्र राणेंच्या विरोधात 'सर्वसामान्य' उमेदवार देऊन त्याच्यासाठी रक्ताचे पाणी करु', अशी रोखठोक भूमिका मांडत बंडाचे निशाण फडकावले.
तसेच बैठकीला कणकवली तालुकाध्यक्ष संदेश सांवत, सभापती लक्ष्मण रावराणे, देवडगातील जिल्हा परिषद सदस्य गणेश राणे, पंचायत समिती सदस्य भाई पारकर, तालुका सरचिटणीस किशोर दळवी, कृष्णा आम्रसकर, जिल्हा उपाध्यक्ष सज्जन रावराणे, नगरसेवक संतोष माईणकर, सुरेंद्र रावराणे, नंदू रावराणे, महेश रावराणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
सतीश सावंत अतुल रावराणेंच्या निवासस्थानी
भाजप निष्ठावंतांची बैठक संपल्यानंतर सुमारे अर्धा तासाने नारायण राणेंची साथ सोडलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत हे अतुल रावराणेंच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनीही उपस्थित भाजप कार्यकर्त्यांशी चर्चा केली. मात्र या चर्चेचा नेमका तपशील समजू शकला नाही. मात्र, भाजप निष्ठावंतांच्या मनातील 'सर्वसामान्य' उमेदवार सतीश सावंत असण्याची शक्यता आहे.