Maharashtra Election 2019: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कणकवलीत येणार; पण कोणाची सभा घेणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 04:41 PM2019-10-10T16:41:17+5:302019-10-10T16:45:13+5:30
कणकवली विधानसभा निवडणूक २०१९ - राज्यभरात शिवसेना -भाजपा युती आहे. भाजपाच्या वाट्याला 164 जागा तर शिवसेना 124 जागांवर लढत आहे. कोकणातील एकमेव मतदारसंघ भाजपाकडे आहे.
मुंबई : कणकवली-देवगड मतदारसंघामध्ये युती तुटलेली असून भाजपामध्येही दोन गट पडले आहेत. माजी आमदार नितेश राणे यांना भाजपाने अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशीच पक्ष प्रवेश दिल्याने शिवसेनेनेच बंडखोरी करत उमेदवार दिला आहे. हा मतदारसंघ भाजपाकडे असून गेल्यावेळी राणे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 15 तारखेला सभा घेणार आहेत.
राज्यभरात शिवसेना -भाजपा युती आहे. भाजपाच्या वाट्याला 164 जागा तर शिवसेना 124 जागांवर लढत आहे. कोकणातील एकमेव मतदारसंघ भाजपाकडे आहे. तर सिंधुदूर्गातील अन्य दोन मतदारसंघापैकी सावंतवाडीमध्ये भाजपाचे गेल्या वेळचे उमेदवार राजन तेली यांनी बंडखोरी केली असून ते राज्य मंत्री दिपक केसरकर यांच्याविरोधात उभे राहिले आहेत. नारायण राणे यांच्याशी फारकत घेतलेले तेली पुन्हा राणेंसोबत जुळवून घेत आहेत. तर कुडाळ-मालवण मतदारसंघात राणेंच्या स्वाभिमान पक्षाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी अपक्ष म्हणून शिवसेनेच्या वैभव नाईकांविरोधात उमेदवारी दाखल केली आहे. अशा प्रकारे तिन्ही मतदारसंघांमध्ये युतीचे तीन तेरा वाजले आहेत.
या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री महाजनादेश संकल्प सभेसाठी कणकवलीत येत असून कणकवली-देवगड मतदारसंघामध्ये कोणासाठी सभा घेणार याचे औत्सुक्य लागून राहिले आहे. कारण भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे नितेश राणेंच्या बाजुने तर संदेश पारकर गट हा शिवसेनेच्या सतीश सावंत यांच्याबाजुने उभा राहिला आहे. राणेंच्या प्रवेशावरून भाजपमध्येच फूट पडलेली आहे. तसेच शिवसेनेने एबी फॉर्म देऊन खासदार विनायक राऊत यांनीच सतीश सावंत युतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे फडणवीसांसमोर कोणाची सभा घ्यायची असा प्रश्न पडला आहे.
फडणवीसांसमोर पर्याय काय?
कणकवली-देवगड हा मतदारसंघ काही काळापासून भाजपाच्या वाट्याला आलेला होता. कोकणात केवळ एकच मतदारसंघ भाजपाकडे आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे भाजपाचे आहेत. जिल्हाध्यक्ष प्रमोद जठारही भाजपाच्या अधिकृत उमेदवारासोबत आहेत. यामुळे मुख्यमंत्री कणकवलीमध्ये नितेश राणेंच्याच प्रचारसभेमध्ये बोलतील. मात्र, शेजारच्या कुडाळ, सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरीमध्येही सभा होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मात्र मुख्यमंत्र्यांना शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागणार आहे.
एका जागेसाठी खटाटोप कशाला?
शिवसेनेमुळे भाजपाला कोकणात कधीच डोके वर काढता आलेले नाही. नारायण राणेंच्या मदतीने कोकण पट्टा ताब्यात घेता येईल असे मनसुबे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे असण्याची शक्यता आहे. राणेंच्या ताब्यात गेलेले मतदारसंघ सेनेने पुन्हा मिळविले आहेत. यामुळे ते भाजपात आणल्यास भविष्यातील निवडणुकांत एकहाती सत्ता येण्याची शक्यता आहे. यामुळे कदाचित फडणवीस कणकवलीला सभा घेणार असल्याची शक्यता आहे.