Maharashtra Election 2019 : नारायण राणेंचे नेतृत्व आणि कर्तृत्वाचा फायदा पक्षविस्तारासाठी होईल - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 02:38 PM2019-10-15T14:38:07+5:302019-10-15T14:39:39+5:30
कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आज कणकवलीत झाली.
कणकवली/ मुंबई - विरोधी पक्षनेते म्हणून नारायण राणे यांनी आक्रमकपणे काम केले होते. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला सुरुवातीलापासूनच मिळाले आहे. आज त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांचा संपूर्ण परिवार भाजपामध्ये दाखल झाला आहे याचा आनंद आहे. नारायण राणेंचे नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा फायदा पक्षविस्तारासाठी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आज कणकवलीत झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे भाजपामध्ये विलीनीकरण झाले, 'नारायण राणेंच्या भाजपाप्रवेशाबाबत अनेक दिवसांपासून विचारणा होत होती. मात्र नारायण राणे हे कधीच भाजपावासी झाले होते. तसेच नितेश राणेंनाही उमेदवारी देताना त्यांना पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले होते. त्यामुळे आता केवळ स्वाभिमान पक्षाच्या विलीनीकरणाचा प्रश्न उरला होता. अखेर हे विलिनीकरण कणकवली येथे करण्याचा निश्चित करण्यात आले. त्यानुसार आज पक्षप्रवेश झाला आहे.''असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ''नारायण राणेंशी सुरुवातीपासूनच माझे चांगले संबंध होते. नारायण राणेंनी विरोधी पक्षनेता म्हणून आक्रमक काम केले होते. विरोधी पक्षात असताना त्याचे मार्गदर्शन सुरुवातीपासूनच लाभले. आज राणेंचा संपूर्ण परिवार भाजपावासी झाला आहे, त्याचा खूप आनंद झाला आहे. नारायण राणेंचे नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा फायदा पक्षाविस्तारासाठी होईल,''असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या मतदारसंघात भाजपाचाच विजय निश्चित आहे. येथे सुमारे 65 ते 70 टक्के मतदान भाजपाला होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ही निवडणूक शांतपणे लढावी, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 वर्षांतील कारभारापेक्षा आम्ही पाच वर्षांत अधिक चांगले काम केले आहे. कोकणाच्या विकासासंदर्भात काही प्रश्न आहेत. त्यापैकी सीवर्ल्डचे काम येत्या दोन वर्षांत करून दाखवू. तसेच नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक सिंधदुर्गात घेतली जाईल, असे आश्वासनही मुख्यंत्र्यांनी दिले. त्याबरोबरच कोकणातून वाहून जाणारे पाणी अडवून कोकणाला टँकरमुक्त करण्याचे काम पुढील काळात केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.