Maharashtra Election 2019 : नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 15:10 IST2019-10-15T13:53:10+5:302019-10-15T15:10:46+5:30
Konkan Vidhan Sabha Election : गेल्या काही काळापासून तारीख पे तारीख करत रेंगाळलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलिनीकरण अखेर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले.

Maharashtra Election 2019 : नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन
कणकवली/मुंबई - गेल्या काही काळापासून तारीख पे तारीख करत रेंगाळलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण आणि कार्यकरत्यांचा भाजपा प्रवेश अखेर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी माजी खासदार निलेश राणेंसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे असंख्य कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल झाले. यावेळीच नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन झाल्याची घोषणा केली. त्यानंतर या सर्व पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे भाजपामध्ये विलिनीकरण झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विलिनीकरणाची घोषणा करताना नारायण राणे यांनी कोकणच्या विकासासाठी आपण भाजपामध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. यावेळी नारायण राणे म्हणाले की, ''गेल्या काही काळापासून पक्षप्रवेशाबाबत विचारणा होत होती. अखेर आज त्या प्रश्नाचं उत्तर बोलता मिळालं आहे. आज माझ्यासह स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आहे.
यावेळी कोकणाच्या विकासाबाबतच्या काही मागण्या नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सहकार्य करावे. येथील विकासासाठी त्यांनी मदत करावी, अशी आमची मागणी आहे, असे नारायण राणे म्हणाले. तसेच कोकणातील नागरिकांचे हित मी नेहमी पाहत आलो आहे आणि त्यासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. आज काही मिळविण्यासाठी मी भाजपमध्ये आलो नाही. महाराष्ट्रातील विकास पाहून मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भाजपमध्ये आलो आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.