Maharashtra Election 2019: नारायण राणेंना उत्तराधिकारी सापडेना? तुल्यबळ समर्थकाचाच अर्ज बाद झाल्याने खळबळ

By हेमंत बावकर | Published: October 8, 2019 01:20 PM2019-10-08T13:20:43+5:302019-10-08T13:23:58+5:30

नारायण राणे यांनी वांद्रे पूर्वमधून पोटनिवडणूक लढविली होती. मात्र, तेथेही पराभव झाला.

Maharashtra Election 2019: Narayan Rane looking for his successor? in Kudal-Malwan Vidhan Sabha Constituency | Maharashtra Election 2019: नारायण राणेंना उत्तराधिकारी सापडेना? तुल्यबळ समर्थकाचाच अर्ज बाद झाल्याने खळबळ

Maharashtra Election 2019: नारायण राणेंना उत्तराधिकारी सापडेना? तुल्यबळ समर्थकाचाच अर्ज बाद झाल्याने खळबळ

googlenewsNext

कणकवली/मुंबई : राज्यभरात कोकणचा वाघ म्हणून ओळख असलेल्या नारायण राणेंना 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव पहावा लागला. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी 10 हजार मतांनी पराभव करत राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. यानंतर राणेंनी निवडणूक लढणार नसल्याची प्रतिज्ञा केली होती. आज पाच वर्षांनी या मतदारसंघात नारायण राणेंना तुल्यबळ उत्तराधिकारी सापडत नसल्याचे चित्र आहे. 


गेल्या काही वर्षांत अनेकांनी नारायण राणे यांची साथ सोडली. यामध्ये या मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर यांची नावे घेता येतील. खरेतर नारायण राणे हे कणकवलीचे मात्र, विधानसभा मतदारसंघांच्या फेररचनेनंतर मालवण हा मतदारसंघ कुडाळला आणि कणकवली देवगडमध्ये जोडला गेला. यामुळे राणे यांनी मालवण-कुडाळ मतदारसंघ निवडला. तर कणकवली राष्ट्रवादीकडे होता. श्रीधर नाईक यांचे पुतणे वैभव नाईक यांनी कणकवलीचे असूनही नारायण राणेंविरोधात मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत लक्षवेधी मते मिळवली. राणे यांनी त्यांचा जवळपास 35 हजार मतांनी पराभव केला. मात्र, 2014 मध्ये नाईक यांनी राणेंचा 10 हजार मतांनी पराभव करत जायंट किलर ठरले. 


यानंतर नारायण राणे यांनी वांद्रे पूर्वमधून पोटनिवडणूक लढविली होती. मात्र, तेथेही पराभव झाला. यंदा कुडाळ-मालवण मतदारसंघात राणे यांच्या तीन समर्थकांची नावे चर्चेत होती. यामध्ये दत्ता सामंत, अॅड. संग्राम देसाई आणि सतीश सावंत यांची नावे होती. यापैकी दत्ता सामंत आणि सतीश सावंत राजकारणात सक्रीय होते. सतीश सावंत हे राणेंचा अत्यंत जवळचे आणि जिल्ह्यातील नेटवर्क बऱ्यापैकी सांभाळणारे खंदे समर्थक होते. गेली 25 वर्षे ते राणेंसोबत होते. त्यांनीच राणे पूत्रावर गंभीर आरोप करत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला. यानंतर मातोश्रीवर जाऊन नितेश राणेंविरोधातच शिवसेनेचा एबी फॉर्म मिळवत आव्हान उभे केले आहे. 


तर दत्ता सामंत यांनी दोन वर्षांपासून मतदारसंघात संपर्क वाढवून शेवटच्या क्षणी त्यांचा अर्ज बाद झाला आहे. सरकारी कंत्राटदार असल्याने त्यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला. यामुळे तुल्यबळ असलेला दुसरा राणे समर्थक बाद झाला. सावधगिरी म्हणून अॅड. संग्राम देसाई यांचा भाऊ आणि सध्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असलेले रणजित देसाई यांनी अपक्ष अर्ज भरला होता. यामुळे आता राणेंची सारी भिस्त देसाई यांच्यावरच आहे. मात्र, देसाई यांची संघटनात्मक ताकद नसल्याने आमदार वैभव नाईकांना कितपत टक्कर देतील याबाबत साशंकताच आहे. 

निलेश राणेंचा पर्याय होता का?
कुडाळ-मालवण मतदारसंघ हा राणेंचा मतदार संघ असल्याने त्या ठिकाणी निलेश राणेंच्या नावाचीही चर्चा होती. दत्ता सामंत हे कंत्राटदार आहेत, ही गोष्ट नारायण राणेंसारख्या मुरब्बी नेत्याला माहिती नसेल का? हा प्रश्न उरतोच. वैभव नाईक यांनी खुद्द राणेंचा पराभव केला, तर नितेश राणे यांच्यासाठी विजय किती सुकर असेल याचाही विचार करण्यात आला असणारच. यामुळे निलेश राणेंचा पर्याय योग्य नसल्याचा विचार नारायण राणेंनी केल्याची समर्थकामध्ये चर्चा आहे.

 

Web Title: Maharashtra Election 2019: Narayan Rane looking for his successor? in Kudal-Malwan Vidhan Sabha Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.