महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'नितेश राणेंचा विजय एकतर्फी'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 02:28 PM2019-10-21T14:28:36+5:302019-10-21T14:35:29+5:30
'एक नंबरचे मताधिक्य आपल्याला मिळेल!'
कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आपल्या कुटुंबीयासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नारायण राणे यांच्या पत्नी निलमताई राणे, उमेदवार नितेश राणे, नंदिता नितेश राणे, प्रियांका निलेश राणे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी नारायण राणे म्हणाले, 'या निवडणुकीत नितेश राणे यांचा एकतर्फी विजय होणार आहे. कार्यकर्त्यांची मेहनत आणि नितेश राणे यांनी लावलेला कामाचा धडाका पाहता नितेश राणे यांचा विजय निश्चित आहे.
एक नंबरचे मताधिक्य आपल्याला मिळेल !
आपण गेल्या पाच वर्षात केलेली कामे आणि भाजपाची साथ यामुळे विधानसभा निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे. महाराष्ट्रातील एक नंबरचे मताधिक्य आपल्याला या मतदार संघातून मिळेल, असे नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.
नितेश राणे 2014च्या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढले होते. तेव्हा भाजपाचे आमदार प्रमोद जठार यांचा पराभव करून ते विजयी झाले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत नितेश राणे भाजपाच्या तिकीटवर निवडणूक लढवत आहेत. राज्यात शिवसेना-भाजपाची महायुती आहे. पण, शिवसेनेने सिंधुदुर्गात युतीधर्म बाजूला सारून नितेश राणे यांच्याविरोधात सतीश सावंत यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक नितेश राणेंसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.
राज्यात एक वाजेपर्यंत 19.47 टक्के मतदान
महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या १३व्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून, सुमारे 9 कोटी मतदार या निवडणुकीत उतरलेल्या 3237 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत. सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी मोठा उत्साह दिसून येत आहे. राज्यातील दिग्गजांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. एक वाजेपर्यंत राज्यात 19.47 टक्के मतदान झाले आहे. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विधानसभेच्या 288 जागांसाठी 3237 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.