Maharashtra Election 2019: 'राणेंची पार्श्वभूमी दरोडेखोरांची; शिवसेनेवर टीका करायची हिंमत नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 01:30 PM2019-10-16T13:30:01+5:302019-10-16T13:30:50+5:30
कणकवली विधानसभा निवडणूक २०१९ - नारायण राणे ज्या ज्या पक्षात गेले त्या पक्षांची अवस्था बघा
कणकवली - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात नारायण राणे विरुद्ध शिवसेना अशी लढत सिंधुदुर्गात पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या वचननाम्याची थट्टा, कुचेष्टा केलेल्या नारायण राणेंची जुळणार कसं? राणेंची पार्श्वभूमी दरोडेखोराची, लुटारुंची आहे, जिल्ह्यात निवडणुकीत पडलेले नरबळी त्यांचेच पाप आहे. मागच्या ५ वर्षात कोणताही हल्ला न करता मतदान होतं, कोणतंही मतदान केंद्र असवंदेनशील राहिलं नाही अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे.
मंगळवारी नारायण राणे यांच्यासह निलेश राणे यांनी भाजपात प्रवेश केला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन केल्याची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी कणकवलीत नितेश राणेंच्या प्रचारासाठी सभा घेतल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार आहेत त्यामुळे नारायण राणेंवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
तत्पूर्वी विनायक राऊतांनी सांगितले की, कणकवलीत विजय शिवसेनेचा होणार आहे. सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघात धनुष्यबाण निवडून येणार आहे. बळी दिल्याशिवाय नारायण राणेंची निवडणूक होत नाही. शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वैर संपण्याची शक्यता नाही, राणे यांच्या विकृतीशी आमचा लढा आहे असं त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, नारायण राणे ज्या ज्या पक्षात गेले त्या पक्षांची अवस्था बघा, मुख्यमंत्र्यांनी ४ शब्द चांगले सांगितले तरी खोड काही जाणार नाही. नारायण राणेंनी कालच्या भाषणात सांगितले की, मी शिवसेनेवर टीका करण्याची सुरुवात करणार नाही पण सुरुवात करायची नारायण राणेंची हिंमत नाही असा टोला खासदार विनायक राऊतांनी लगावला आहे.
यापूर्वी दीपक केसरकर यांनी नारायण राणेंवर टीका केली. नारायण राणे हे दुस-यांचे पक्ष विसर्जित करण्यास निघाले होते. पण आता त्यांनाच स्वत: चा पक्ष विसर्जित करावा लागला. हा सर्व नियतीचा खेळ असून, माझी लढाई ही प्रवृत्तीशी आहे. जर भविष्यात राणेंना भाजपाच्या विचारमंथन शिबिरात सहभागी करून घेतले आणि त्यांची विचारधारा बदलली तर त्यांच्याशी असलेला माझा राजकीय संघर्षही संपेल, असं मत दीपक केसरकर यांनी मांडले आहे.