Maharashtra Election 2019: 'शिवसेना वचननामा हास्यास्पद; 10 रुपयांची थाळी मातोश्रीवर बनविणार का?'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 11:32 AM2019-10-13T11:32:18+5:302019-10-13T11:32:58+5:30
कणकवलीतून शिवसेनेने उमेदवार उभा केलाय त्याची दखल घेत नाही, काम करणारे आमदार म्हणून नितेश राणे प्रसिद्ध आहे
सिंधुदुर्ग - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगताना पाहायला मिळणार आहे. शिवसेनेने 10 रुपयात सकस जेवण देणार असं आश्वासन दिलं आहे. त्यावरुन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरे वचननामा पूर्ण कुठून करणार याचं बजेट कुठून आणणार? 10 रुपयात थाळी देणार त्यातील नुकसान कोण भरुन देणार? उद्धव ठाकरे सातबारा कोरा करणार असं म्हणतात. त्यांना सातबारा तरी माहित आहे का? अशा शब्दात नारायण राणेंनी शिवसेनेवर प्रहार केलेला आहे.
यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची तिन्ही उमेदवार निवडून येणार हे नक्की, कणकवलीतून शिवसेनेने उमेदवार उभा केलाय त्याची दखल घेत नाही, काम करणारे आमदार म्हणून नितेश राणे प्रसिद्ध आहे, कुडाळच्या आमदाराचं नाव तरी आहे का? जनतेला विकास पाहिजे अन् नोकऱ्या पाहिजे त्यामुळे सिंधुदुर्गातील जनता भाजपाच्या पाठिशी ठाम आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील कटुता कधी संपणार यावरही राणे यांनी भाष्य केलं. दोन्ही बाजूने कटुता संपण्याचा विचार होत असेल तर नक्की केला जाईल. आमची बाजू मजबूत आहे. आमचा विजय निश्चित आहे असं यावेळी नारायण राणेंनी सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचारासाठी येणार नाहीत, काही नेते पुड्या सोडत आहे असं विधान सुभाष देसाई यांनी केलं होतं. त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, सुभाष देसाईंच्या वक्तव्यावर भाष्य करणार नाही, शिवसेनेत त्यांना किती महत्व आहे हे माहित आहे, शिवसेनेत भांडणं लावायचं काम सुभाष देसाई यांनी केलं. मुख्यमंत्री सिंधुदुर्गात प्रचारासाठी येणार हे ठरलं आहे. तसं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेतही जाहीर केलं आहे असा टोला नारायण राणेंनी सुभाष देसाईंना लगावला. कणकवली विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे यांचे पूत्र नितेश राणे हे भाजपाकडून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राज्यात युतीच्या माध्यमातून लढणारे भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र एकमेकांच्या विरोधात निवडणुकीला सामोरे जात आहे.