महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : सिंधुदुर्ग, रत्नागिरीत शिवसेनेची भगवी लाट कायम ; राणेंनी कणकवलीचा गड राखला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 03:43 AM2019-10-25T03:43:26+5:302019-10-25T06:11:45+5:30
Maharashtra Election 2019: विधानसभा निवडणुकीच्या निकालात शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यावरील आपले वर्चस्व कायम ठेवत तीनपैकी दोन जागा जिंकल्या.
- मनोज मुळ्ये/ महेश सरनाईक
सिंधुदुर्ग / रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या निकालात शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यावरील आपले वर्चस्व कायम ठेवत तीनपैकी दोन जागा जिंकल्या. सावंतवाडीत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी हॅट्ट्रीक केली. युती तोडून अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या कणकवली मतदारसंघात नारायण राणेंनी भाजपच्या पाठबळावर शिवसेनेला मोठ्या मताधिक्याने धोबीपछाड दिला. येथे नीतेश राणेंनी शिवसेनेच्या सतीश सावंत यांचा दारूण पराभव केला. तर, रत्नागिरी जिल्ह्यातही सेनेने गतनिवडणुकीपेक्षा एक अधिक जागा मिळवली. येथील पाचपैकी चार जागा शिवसेनेने जिंकल्या. राष्ट्रवादीने गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या दोन जागा यंदा गमावल्या असल्या तरी चिपळूण येथे शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांचा पराभव करत राष्ट्रवादीचे शेखर निकम यांनी बाजी मारली. दापोलीत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अनुभवी ‘फिल्डींग’मुळे शिवसेनेचे योगेश कदम विजयी झाले.
कणकवलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असलेल्या जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांना भाजपमध्ये दाखल झालेल्या नीतेश राणेंविरोधात मैदानात उतरविले होते. यासाठी राज्यातील युतीलाही तडा दिला. स्वत: कणकवलीत सभा घेऊन मोठी व्यूहरचनाही आखली. मात्र, नीतेश राणे यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे ठाकरेंचे मनसुबे धुळीस मिळवले. कुडाळ मतदार संघात वैभव नाईक सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. सावंतवाडी मतदार संघात दीपक केसरकर यांनी विजयाची हॅट्ट्रीक केली.
दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात गतनिवडणुकीपेक्षा एक अधिक जागा मिळवून रत्नागिरी हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचे शिवसेनेने दाखवून दिले. येथील पाचपैकी चार जागा शिवसेनेने जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने गत निवडणुकीत जिंकलेल्या दोन्ही जागा गमावल्या असल्या तरी चिपळूण विधानसभा मतदार संघात विजय मिळवून सेनेला धक्का दिला.
रत्नागिरतील दापोली मतदार संघात शिवसेनेचे योगेश कदम आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांच्यात चुरशीची लढत झाली. यात कदम यांनी बाजी मारली. गुहागर मतदार संघात मावळते आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासमोर शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले सहदेव बेटकर उभे होते. भाजपमध्ये नाराजी होती. समाजाचे कार्ड वापरले गेले. मात्र तरीही जाधव यांनी विजय मिळवला.
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आणि लोकसभा निवडणुकीत ५७ हजारांचे मताधिक्य घेणाºया शिवसेनेला चिपळूणमध्ये मोठा धक्का बसला. विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांना राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांचा पराभव केला.
राजापूरमध्ये चुरशीची लढत
रत्नागिरी मतदारसंघातील निवडणूक एकतर्फी झाली. येथे विजयाचा चौकार मारणाºया शिवसेनेच्या उदय सामंत यांनी राष्ट्रवादीच्या सुदेश मयेकर यांचा तब्बल ८७,१४७ मतांनी पराभव केला. सर्वांत चुरशीची लढत राजापूर मतदारसंघात झाली. पहिल्या दहा फेºयांमध्ये काँग्रेसचे अविनाश लाड आघाडीवर होते. मात्र त्यानंतर शिवसेनेच्या राजन साळवी यांनी मुसंडी मारत ११ हजार ८७६ मतांनी विजय मिळवला.