...तर शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वाद नक्कीच संपेल, दीपक केसरकर यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 04:23 PM2019-10-15T16:23:30+5:302019-10-15T16:26:05+5:30
नारायण राणेंच्या भाजपाप्रवेशानंतर शिवसेनेचे सिंधुदुर्गातील नेते आणि राज्य सरकारमधील गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले आहे.
सावंतवाडी - राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आज भाजपात विलीन केला. सोबतच पुत्र निलेश राणेंसह भाजपामध्ये प्रवेश केला. दरम्यान, नारायण राणेंच्या भाजपाप्रवेशानंतर शिवसेनेचे सिंधुदुर्गातील नेते आणि राज्य सरकारमधील गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले आहे. नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंविरोधात केलेल्या विधानाबाबत जाहीर माफी मागितल्यास शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वाद निश्चितपणे संपतील, असे केसरकर यांनी म्हटले आहे.
राणेंच्या भाजपाप्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना दीपक केसरकर म्हणाले की, ''नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंविरोधात केलेल्या विधानाबाबत जाहीर माफी मागितल्यास शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वाद निश्चितपणे संपतील. नारायण राणे आता योग्य पक्षात गेले आहेत. त्यामुळे त्यांचे आणि माझे वैरसुद्धा संपेल. मात्र आता नारायण राणे यांनी संघाची विचारधारा आणि तत्त्वज्ञान आचरणात आणण्याची गरज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, गेल्या काही काळापासून तारीख पे तारीख करत रेंगाळलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे भाजपातील विलीनीकरण अखेर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी माजी खासदार निलेश राणेंसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे असंख्य कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल झाले. यावेळीच नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन झाल्याची घोषणा केली.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विलिनीकरणाची घोषणा करताना नारायण राणे यांनी कोकणच्या विकासासाठी आपण भाजपामध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. यावेळी नारायण राणे म्हणाले की, ''गेल्या काही काळापासून पक्षप्रवेशाबाबत विचारणा होत होती. अखेर आज त्या प्रश्नाचं उत्तर बोलता मिळालं आहे. आज माझ्यासह स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आहे. अशी घोषणा राणेंनी केली.