महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : कणकवलीत नितेश राणे 10 हजार मतांनी आघाडीवर, शिवसेनेचे सतीश सावंत पिछाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 10:01 AM2019-10-24T10:01:29+5:302019-10-24T10:03:08+5:30
Maharashtra's Konkan Vidhan Election Result 2019: गेल्या काही दिवसांपासून कणकवली मतदारसंघ चर्चेत राहिला आहे.
मुंबई/कणकवली- गेल्या काही दिवसांपासून कणकवली मतदारसंघ चर्चेत राहिला आहे. या मतदारसंघात भाजपा उमेदवार नितेश राणे आणि शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्यात अटीतटीची लढत आहे. या निवडणुकीचा काही कल हाती आला असून, चौथ्या फेरीअखेर भाजपा उमेदवार नितेश राणे 10 हजार मतांनी आघाडीवर आहेत. नितेश राणेंनी मतमोजणीच्या सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. त्यांच्या तुलनेत सतीश सावंत मागे पडल्याचं चित्र आहे. त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कणकवलीत फटाके फोडून जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.
नारायण राणेंबरोबर 25 वर्षं राहिल्यानंतर सतीश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती. तसेच नितेश राणेंच्या एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीलाही सतीश सावंतांच्या उमेदवारीमुळे रंगत आली होती. शिवसेनेनंही नितेश राणेंना पाडण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती, युतीत भाजपाच्या वाट्याचा असलेला या मतदारसंघातही शिवसेनेनं अधिकृत उमेदवार म्हणून सतीश सावंतांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्यामुळे नितेश राणे जिंकतात, की सतीश सावंतांचा पराभव होतो हे काही वेळातच समजणार आहे.