महाराष्ट्र शैक्षणिक राजधानी म्हणून उदयास यावे - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 27, 2022 04:13 PM2022-08-27T16:13:37+5:302022-08-27T16:18:06+5:30
महाराष्ट्र राज्य अग्रगण्य बनवायचे असेल तर शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल करावे लागतील. आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी केले.
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र केवळ आर्थिक राजधानी न राहता हे राज्य शैक्षणिक राजधानी म्हणून संपूर्ण देशात उदयास यावे. अशी अपेक्षा राज्यपाल तथा मुंबई विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली. त्याचबरोबरीने सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्ग संपन्न, सुंदर प्रदेश असून त्याला आपण सर्वांनी मिळून सुंदरतम बनवूया असे आवाहन केले.
मुंबई विद्यापीठातंर्गत कणकवली तालुक्यातील तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचा (मॉडेल कॉलेज) परिसर शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायक, मार्गदर्शक ठरावा असेही ते म्हणाले. राज्यपालांच्या हस्ते आज इमारतीचे (कॅम्पस) उद्घाटन झाले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र.कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, मानद मार्ग निर्देशक विनायक दळवी आदी उपस्थित होते.
यावेळी दीपक केसरकर म्हणाले, निसर्गाने सिंधुदुर्ग जिल्ह्यावर मुक्त हस्ते उधळण केली आहे. भविष्यात राज्यात सिंधुदुर्ग शैक्षणिक पॅटर्न निर्माण करण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.
आमदार नितेश राणे म्हणाले, मुंबई विद्यापीठाच्या या कॅम्पसमुळे अल्पदरात विद्यार्थ्यांना चांगले व्यावसायिक प्रशिक्षण मिळेल. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होईल तसेच सिंधुदुर्गाच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्व मतभेद विसरून एकत्रित येऊ.
प्रारंभी कुलगुरू पेडणेकर यांनी प्रास्ताविक करताना या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली. विनायक दळवी यांनी ही समोयिचीत विचार व्यक्त केले. या कॅम्पस उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी मुंबई विद्यापीठाचे गौरव गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल पाटील तर आभार प्रदर्शन प्र.कुलगुरू रविंद्र कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे समन्वयक श्रीपाद वेलिंग यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंधुदुर्गातील प्रत्येक व्यक्ती कोमल मनाची
राज्यपाल म्हणाले, आपण जेथे जेथे कार्यक्रमाला जातो. तेथे तेथील अधिकाऱ्यांच्या कमतरता तक्रारींचा सूर असतो. येथे मात्र अधिकारी वर्गाचे अभिनंदन केले जात आहे. त्यांच्या चांगल्या गुणांचे कौतुक होत आहे. हे वाखाणण्याजोगे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा खूपच सुंदर आहे. त्याप्रमाणे येथील प्रत्येक व्यक्ती कोमल मनाची असून सुंदरतेने भरलेली आहे.
शिक्षण क्षेत्रात नवीन बदल अंगीकारूया...
पंतप्रधानांना अपेक्षित काम करताना शिक्षण क्षेत्रात नवीन प्रणाली आणण्यासाठी आपण कार्यरत राहूया. महाराष्ट्र राज्य अग्रगण्य बनवायचे असेल तर शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल करावे लागतील. आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी केले.