कणकवली राणेंचीच! नगराध्यक्षपद आणि 11 जागांवर बाजी मारत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राखले निर्विवाद वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 11:10 AM2018-04-12T11:10:26+5:302018-04-12T11:10:26+5:30
माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी कणकवली शहरावरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने
सिंधुदुर्ग - माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी कणकवली शहरावरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने नगराध्यक्षपदासह 17 पैकी 11 जागांवर विजय मिळत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी भाजपाच्या संदेश पारकर यांना पराभवाचा धक्का दिला. भाजपा आणि शिवसेना आघाडीला केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले.
माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि शिवसेना-भाजपा युतीने सर्वस्व पणाला लावल्याने कणकवली नगरपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय जगताचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत 11 जागा जिंकत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने जोरदार मुसंडी मारली. मात्र नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची झाली. कणकवली शहरात बऱ्यापैकी वर्चस्व असलेले संदेश पारकर यांच्यासमोर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या समीर नलावडे यांनी कडवे आव्हान उभे केले होते. अखेर या निवडणुकीत नलावडे यांनी अवघ्या 37 मतांनी बाजी मारत पारकरांना पराभवाचा धक्का दिला.
नारायण राणे यांच्यासाठी कणकवलीतील निवडणूक ही अस्तित्वाची लढाई होती आणि ती लढाई पुन्हा एकदा राणेंनी जिंकून त्यांच्या विरोधकांना धूळ चारली आहे. नारायण राणे हे भाजपाचे खासदार आहेत. असे असताना राणे यांनी कणकवलीत भाजपा विरोधातच दंड थोपटले होते. त्यामुळे राणे यांचा विजय होतो की भाजपाचा? हे पाहणे औत्सुक्याचे होते. कणकवली नगरपंचायत निवडणूक ही सिंधुदुर्गच्या राजकारणाची दिशा ठरविणारी होती. नारायण राणे यांना विरोध म्हणून शिवसेनेने येथे भाजपाशी युती केली होती.
कणकवली नगरपंचायतीच्या १६ नगरसेवक पदांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी ६ एप्रिलला मतदान झाले. तर प्रभाग १० मध्ये बुधवार ११ एप्रिलला मतदान झाले होते. त्यानंतर गुरुवारी १२ एप्रिलला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. पहिल्या फेरीपासूनच स्वाभिमानने नगरसेवक निवडून आणण्यात मोठी आघाडी घेतली होती. यात पहिल्या फेरीत ६ पैकी ५ जागा स्वाभिमानने पटकावल्या.
स्वाभिमानला सर्वाधिक जागा
कणकवली नगरपंचायतीच्या १७ जांगापैकी स्वाभिमान पक्षाला सर्वाधिक १0 जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादीला १ जागा मिळाली. त्यामुळे स्वाभिमान-राष्ट्रवादीच्या आघाडीला ११ जागा मिळाल्या. त्यानंतर शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी ३ जागा मिळाल्या आहेत.
संदेश पारकर अवघ्या ३७ मतांनी पराभूत
नगराध्यक्ष पदासाठी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांचा स्वाभिमान-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार समीर नलावडे यांनी अवघ्या ३७ मतांनी पराभव केला. त्यामुळे कणकवली नगरपंचायतीची नगराध्यक्ष पदाची लढाई अपेक्षेप्रमाणे अत्यंत अटीतटीची झाली.
कणकवलीमधील प्रभागानुसार निकाल
प्रभाग क्र. १ - कविता राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष ),
प्रभाग क्र. २ - प्रतीक्षा सावंत (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष),
प्रभाग क्र. ३ - अभिजित मुसळे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष),
प्रभाग क्र. ४ - आबिद नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस),
प्रभाग क्र. ५ - मेघा गांगण (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष),
प्रभाग क्र. ६ - सुमेधा अंधारी (भाजप)
प्रभाग क्र. ७ - सुप्रिया समीर नलावडे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष),
प्रभाग क्र. ८ - उर्मी योगेश जाधव (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष),
प्रभाग क्र. ९ - मेघा सावंत (भाजप),
प्रभाग क्र. १० - माही परुळेकर (शिवसेना),
प्रभाग क्र. ११ - विराज भोसले (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष),
प्रभाग क्र.१२ - गणेश उर्फ बंडू हर्णे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)
प्रभाग क्र. १३ - सुशांत नाईक (शिवसेना)
प्रभाग क्र. १४ - रुपेश नार्वेकर (भाजप)
प्रभाग क्र. १५ - मानसी मुंज (शिवसेना)
प्रभाग क्र. १६ - संजय कामतेकर (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)
प्रभाग क्र. १७ - रवींद्र गायकवाड (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)