Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निलेश राणेंचं ठरलं! धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 01:40 PM2024-10-22T13:40:51+5:302024-10-22T13:42:35+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. जागावाटपांबाबत बैठकांचे सत्र सुरू असून भाजपाने ९९ जागांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे कोकणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी खासदार निलेश राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून कुडाळ विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढणार आहे. याबाबत राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
उद्या बुधवारी २३ ऑक्टोंबर रोजी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती निलेश राणे यांनी दिली. पत्रकार परिषदेत बोलताना माजी खासदार निलेश राणे म्हणाले, मी २०१९ ला राणे साहेबांसोबत भाजपामध्ये प्रवेश केला होता. भाजपामधील सगळ्या नेत्यांनी आदर दिली खूप प्रेम दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी मला लहान भावाप्रमाणे सांभाळलं, पक्षामध्ये स्थान दिलं. राजकारणात सुरुवातीपासून राणे साहेबांच्यासोबत मी राहिलो आहे. उद्या २३ तारखेला दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतीमध्ये कुडाळ हायस्कूल मैदानावर माझ्या प्रवेशाची सभा होणार आहे. माझा प्रवेश उद्या नक्की झाला आहे, अशी माहिती माजी खासदार निलेश राणे यांनी दिली.
"युतीच्या प्रोटोकॉलनुसार आपल्याला काम करायला लागते. या मतदारसंघात मी खूप वर्षे काम करत आहे, लोकसभेला आम्ही २७ हजाराचे लीड घेतले. ९० टक्के ग्रामपंचायती जिंकल्या, खरेदी विक्री संघ आम्ही जिंकले आहेत. खासदारकीही आम्ही जिंकली आहे. येणारी विधानसभाही आम्ही टीमवर्कने लढणार आहोत, असंही निलेश राणे म्हणाले.
...त्याच चिन्हावर काम करायला मिळणार याचा आनंद
" राणे साहेबांची सुरुवात ज्या चिन्हावरुन झाली, आज मला त्याच चिन्हावर काम करण्याची संधी मिळणार आहे. या गोष्टीचा मला आनंद आणि समाधान आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला काम करायला मिळणार आहे, असंही राणे म्हणाले.
निलेश राणे म्हणाले, हा मतदारसंघ टॉपमध्ये कसा येईल हा माझा प्रयत्न आहे. मी एकदा खासदार झालोच आहे. २१ व्या शतकातील मतदारसंघ वाटला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करत आहे. पक्षहितासाठी मला जे करावं लागणार ते मी करणार आहे.
२००५ नंतर राणे पुन्हा शिवसेनेत
२००५ मध्ये खासदार नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, आता पुन्हा १९ वर्षानंतर नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. १९ वर्षानंतर पहिल्यांदा ते शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.