महाराष्ट्र निवडणूक निकालः भाजपाच्या नितेश राणेंनी करून 'दाखवलं'; शिवसेनेचे सतीश सावंत पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 01:45 PM2019-10-24T13:45:13+5:302019-10-24T13:46:21+5:30
गेल्या काही दिवसांपासून कणकवली मतदारसंघ चर्चेत राहिला आहे.
कणकवलीः गेल्या काही दिवसांपासून कणकवली मतदारसंघ चर्चेत राहिला आहे. या मतदारसंघात भाजपा उमेदवार नितेश राणे आणि शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्यात अटीतटीची लढत झाली. या निवडणुकीत नितेश राणेंनी 20 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी मताधिक्यांची घोडदौड कायम राखली आहे. आठव्या फेरीअखेर नितेश राणे यांना 12,915 मताधिक्य मिळाले.
नवव्या फेरीमध्ये देवगड तालुक्याची मतमोजणी पूर्ण झाली. त्यानंतर 12व्या फेरीत नितेश राणेंनी 17944 मतांची आघाडी घेतली होती. तसेच तेराव्या फेरीत 18,432 मतांनी पुढे होते. 15व्या फेरीत नितेश राणे यांनी 21063 हजार, 19व्या फेरीमध्ये 25,203 मताधिक्क्यांची निर्णायक आघाडी घेतल्यानंतर त्यांचा विजय जवळपास निश्चित असून, फक्त अधिकृत घोषणा होण्याचीच बाकी आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कणकवलीत फटाके फोडून जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.
नारायण राणेंबरोबर 25 वर्षं राहिल्यानंतर सतीश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती. तसेच नितेश राणेंच्या एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीलाही सतीश सावंतांच्या उमेदवारीमुळे रंगत आली होती. शिवसेनेनंही नितेश राणेंना पाडण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती, युतीत भाजपाच्या वाट्याचा असलेला या मतदारसंघातही शिवसेनेनं अधिकृत उमेदवार म्हणून सतीश सावंतांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं.