महाराष्ट्र स्वाभिमान राज्यातील निवडणूका लढवणार : नारायण राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 05:28 PM2018-07-06T17:28:33+5:302018-07-06T17:29:39+5:30
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यातील विधानसभा व लोकसभेच्या निवडणूका लढविणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री तथा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथे केली.
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यातील विधानसभा व लोकसभेच्या निवडणूका लढविणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री तथा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथे केली.
सिंधुदुर्गच्या विकासासाठी जागतिक स्तरावरील प्रकल्प आपण आणले. मात्र गेल्या चार वर्षात एकही प्रकल्प पालकमंत्र्यांना पूर्ण करता आला नाही हे दुर्दैव आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला असून, वीस वर्षांनी जिल्हा मागे गेला आहे, अशी जोरदार टिका त्यांनी कुडाळ येथे केली.
राणे म्हणाले, आगामी लोकसभा व विधानसभेच्या या जिल्ह्यातील सर्व जागा स्वाभिमान पक्षाच्यावतीने लढवून या चारही जागा जिंकणार आहे. तसेच राज्यात पक्षाच्यावतीने निवडणूक लढविल्या जाणाऱ्या जागा निवडणूका जवळ आल्यावर जाहीर करणार आहे.
यावेळी राणे यांनी सांगितले की, या जिल्हाचा विकास व्हावा या दृष्टीने या जिल्ह्यात अनेक प्रकल्प आणले. मात्र चार वर्षे पूर्ण करणाऱ्या सरकारला व येथील दुर्दैवी पालकमंत्र्यांना एकही प्रकल्प पूर्ण करता आला नसल्याने या चार वर्षात या जिल्ह्याचा विकास पुर्णपणे ठप्प झालेला असून विकासाच्या बाबतीत हा जिल्हा पूर्णपणे मागे गेला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्याच्या विकासासाठी दरवर्षी नवीन प्रकल्प जिल्ह्यात येणे गरजेचे आहे. पण जुने प्रकल्प पूर्ण नसून आताच्या पालकमंत्र्यांना एक नवीन प्रकल्प आणता आला नाही, असा टोलाही त्यांनी केसरकरांना लगावला.
महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी महामार्गावर खड्डे पडले असून या महामार्गाची दुरूस्ती करण्याबाबत ठेकेदारांशी बोललो असून येत्या दोन दिवसात दुरूस्ती न झाल्यास मंत्र्यांशी याबाबत भेटेन, अन्यथा पक्षाच्यावतीने महामार्ग बंद आंदोलन करू असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी स्वाभिमानचे जिल्हाधक्ष दत्ता सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विकास कुडाळकर, जिल्हा बँक संचालक सतीश सावंत, जिल्हा परिषद उपाधक्ष रणजित देसाई, कुडाळ तालुकाध्यक्ष दीपक नारकर, नगराध्यक्ष विनायक राणे, संदीप कुडतरकर, विशाल परब उपस्थित होते.
जिल्ह्यात अनैतिक धंदे व भ्रष्टाचाराची वाढ
या चार वर्षात जिल्ह्याचा विकास पुर्णपणे ठप्प असून रेशनवर धान्य नाही. जनतेची कामे होत नसून या उलट अनैतिक धंदे व भ्रष्टाचाराचे प्रमाण या जिल्ह्यात वाढत आहे. जिल्ह्यात अधिकाऱ्यांची दादागिरी वाढत असून त्यांच्यावर पालकमंत्री व सत्ताधारी आमदार यांचा वचक नसून अधिकारी त्यांची दखल घेत नसल्याचा टोलाही राणे यांनी यावेळी लगावला.
दोन दिवसात केसरकरांना नोटीस पाठविणार
जिल्ह्यातील रूग्णांना माफक व दर्जेदार सेवा देता यावी या उद्देशाने पडवे येथे लाईफटाईम हे हॉस्पीटल सुरू केले असून केसरकर हे जलसीने, आकसाने व दृष्टबुध्दीने हॉस्पीटलची बदनामी करीत असून त्यांची ही बदनामी मी सहन करणार नाही. बदनामीप्रकरणी येत्या दोन दिवसात त्यांना वकीलामार्फत कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचे राणे यांनी जाहीर केले.