महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या विरोधात: प्रमोद जठार यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 12:23 PM2020-10-21T12:23:57+5:302020-10-21T12:28:28+5:30
bjp, Farmar, Pramod Jathar, sindhudurgnews महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून आता सरकारमधील कार्यकर्ते मूग गिळून गप्प का? असा सवाल भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केला आहे.
देवगड : महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून आता सरकारमधील कार्यकर्ते मूग गिळून गप्प का? असा सवाल भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकारचे गॉडफादर शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात जी संकल्पना मांडली तीच संकल्पना केंद्र शासनाने केलेल्या कृषी कायद्यातून सत्यात आली. मात्र, या कायद्याला महाविकास आघाडी शासनाने विरोध केला आहे. विरोध करणाऱ्या सरकारमधील घटक असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या आत्मचरित्रातील पान क्रमांक २३८ वाचावे,असा सल्ला भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिला आहे.
भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रमोद जठार बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, शहरअध्यक्ष योगेश पाटकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर आदी उपस्थित होते.
केंद्रशासनाच्या कृषी विधेयकाला राज्यशासनाने विरोध केला. यावरून जठार यांनी राज्यसरकारवर हल्लाबोल केला. या विधेयकाला राज्यशासनाने विरोध केला यावरून आत्मचरित्रात भूमिका मांडून शेतकऱ्यांबद्दल दाखवित असलेला एक चेहरा व प्रत्यक्षात सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कायद्याला विरोध करून दाखवित असलेला चेहरा हा आता जनतेने ओळखणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी, सेना, काँग्रेसचे कार्यकर्ते आत मूग गिळून गप्प का? असा सवाल जठार यांनी करीत शासनाच्या या धोरणाबाबत आवाज उठविणार असल्याचे सांगितले.
विरोधासाठी विरोध, सरकारकडून सुडाचे राजकारण
हे सरकार केवळ विरोधासाठी विरोध करून सुडाचे राजकारण करीत आहे, असा घणाघात जठार यांनी केला. आघाडी सरकारमधील मंत्र्यांना त्यांचे गॉडफादर असलेले शरद पवार यांचे आत्मचरित्र वाचायला देण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या हिताच्या कायद्याला विरोध करणाऱ्या सत्तेविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा जठार यांनी दिला.
नाणार प्रकल्पाला विरोध करून सेनेने तरुणांचा रोजगार घालविला. कृषी विधेयकाला विरोध करून राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या हिताचा आड येत आहे. यावरूनच महाविकास आघाडीतील घटक पक्षांची शेतकरी, ग्राहक, युवावर्ग यांच्याबद्दलची असलेली कळकळ दिसून येत आहे.
एकीकडे महाविकास आघाडीचे गॉडफादर शरद पवार यांच्या आत्मचरित्रात कृषी उत्पन्न बाजार समिती ही संकल्पना कालबाह्य झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल खुल्या बाजारपेठेत विकावा अशी संकल्पना मांडली. हीच संकल्पना मोदींनी कृषी कायद्यातून सत्यात आणली.