सिंधुदुर्गातील राजकीय दहशतवादाचा बीमोड करूया!, सतीश सावंतांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 05:36 PM2021-12-22T17:36:24+5:302021-12-22T17:36:46+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सहकार समृद्धी पॅनेलच्या माध्यमातून १९ उमेदवारांसह निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ कणकवली येथे करण्यात आला.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात काही मंडळी राजकीय दहशतवाद आणू पाहत आहेत. या दहशतवादाचा बीमोड करण्याचा निर्धार मी केला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदारांनी हा राजकीय दहशतवाद मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनेलच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सहकार समृद्धी पॅनेलच्या माध्यमातून १९ उमेदवारांसह निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ कणकवली येथे बुधवारी करण्यात आला यावेळी सतीश सावंत बोलत होते.
ते म्हणाले, जिल्हा बँक ही सिंधुदुर्गची शिखर बँक आहे. ही सर्वसामान्यांची बँक असून लटारूंच्या हाती जावू न देणे ही मतदारांची जबाबदारी आहे. मतदारांनी विरोधी गटाच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन सतीश सावंत यांनी मतदारांना केले. साडेसात वर्षांत मी व संचालक मंडळाने ही बँक अबाधित ठेवण्याचे काम केलेले असून आम्हाला पुन्हा संधी दिल्यास बँकेच्या माध्यमातून आम्ही चांगले काम करू असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.