महावितरणला बसणार ५ कोटींचा फटका
By admin | Published: March 24, 2016 11:16 PM2016-03-24T23:16:11+5:302016-03-24T23:39:52+5:30
पर्ससीन बंदी : बर्फ कारखानेही बंद होण्याच्या मार्गावर
रत्नागिरी : शहरातील पर्ससीन नेट मासेमारीवरील बंदीमुळे जिल्ह्यातील बर्फ कारखानेही बंद होण्याच्या स्थितीत आहेत. या बंदीचे दूरगामी परिणाम होणार असून, महावितरणला सुमारे ४ ते ५ कोटी रुपयांचा फटका यामुळे बसणार आहे.
पर्ससीन नेट बंदीमुळे मच्छीमार रडकुंडीला आले आहेत. महिना उलटला तरी पर्ससीन नेटने मासेमारी करण्यावरील बंदी उठवण्याबाबत शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या व्यवसायासाठी पर्ससीन नेटधारकांवर लाखो रुपयांचे कर्ज आहे. त्यांनी बँका, व्यापारी आणि खासगी वित्तीय संस्थांकडूनही कर्जाची उचल केली आहे. बंदी लादल्यानंतर सुमारे दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप मासेमारी सुरु न झाल्याने खलाशांचा खर्च कसा भागवावा, कर्जाचे हप्ते कसे भरावेत, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. पर्ससीन नेटधारकांनाही यंदाच्या मोसमामध्ये मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने बँकांचे हप्ते थकले आहेत. ते भरण्यासाठी बँकांनी तगादा लावला आहे. त्यामुळे मच्छीमारांना डोक्यावर कर्जाचं ओझं घेऊन जगणे मुश्किल झाले आहे. मासेमारीवर अनेक जोडधंदे व अन्य व्यावसायिक अवलंंबून आहेत. मासे टिकवण्यासाठी महत्वाचा घटक ठरणाऱ्या बर्फ कारखान्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न या बंदीमुळे निर्माण झाला आहे. पर्ससीन नेटने मासेमारी करणाऱ्या नौका आणि मच्छी व्यावसायिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बर्फ कारखान्यातून बर्फाची उचल करण्यात येत होती. रत्नागिरी परिसरामध्ये सुमारे २५ बर्फ कारखाने आहेत. या कारखान्यांमधून हजारो टन बर्फाची उचल होेत होती. या बर्फ कारखान्यांमधून महावितरणला महिन्याला ५० लाख रुपयांचे बिल मिळते. त्यामुळे वर्षाला कारखान्यांमधून बिलापोटी महावितरणला ५ कोटी रुपये मिळतात. त्यामुळे अनेक व्यवसाय उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. (शहर वार्ताहर)
1उद्योग धोक्यात : विजेचे बिल भरणे न परवडण्यासारखे
बर्फ कारखाने बंद झाल्यास महावितरणला वर्षाकाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. पर्ससीन नेटवरील बंदीचे दूरगामी परिणाम दिसू लागले आहेत. बर्फ कारखाने बंद पडल्यास महावितरणचे मोठे नुकसान होणार आहे. मच्छीमारी मंदावल्याने बर्फ कारखाने धोक्यात आले आहेत.
2सध्या पर्ससीन नेटने मासेमारीला बंदी असल्याचे बर्फाची उचल अत्यल्प झाली आहे. त्यामुळे या कारखान्यांना विजेचे बिल भरणे न परवडणारे आहे. पर्ससीन नेटवरील बंदीमुळे बर्फ कारखान्यांचा धंदा मंदावला असून, ते बंद होण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे हा व्यवसायही धोक्यात आला आहे.
उद्योग संकटात
बर्फ कारखान्याला जास्त वीज लागते, त्यामानाने बर्फाला मागणी खूपच कमी होणार आहे. त्यामुळे हे कारखाने सुरु ठेवणेही उद्योजकांच्या आवाक्यापलिकडे जाणार असून, त्यामुळे हा उद्योग संकटात सापडला आहे.