Vidhan Sabha 2019 :सिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 07:25 PM2019-09-21T19:25:21+5:302019-09-21T19:28:50+5:30

नारायण राणेंनी आपण लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा वारंवार केली आहे.

mahayuti politics depends on narayan rane's move in sindhudurg | Vidhan Sabha 2019 :सिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले

Vidhan Sabha 2019 :सिंधुदुर्गातील युतीचे राजकारण नारायण राणेंभोवती गुरफटले

googlenewsNext

- महेश सरनाईक

सावंतवाडी : शिवसेना-भाजपची युती असो किंवा कोकणातील राजापूर-नाणारमध्ये होणारा रिफायनरी प्रकल्प असो, राज्याच्या राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सभोवताली फिरत राहिला आहे. येत्या दोन दिवसांत राज्यातील सर्व राजकीय गुंता सुटून पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी वेग घेणार आहे.


२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात कमालीचे बदल झाले. त्यापूर्वी २५ ते ३० वर्षे जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकर ठरणाऱ्या नारायण राणे यांना कुडाळ-मालवण मतदार संघातून पहिल्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेने २००४ नंतर १० वर्षांनी पुन्हा एकदा सिंधुदुर्गात तीन पैकी दोन जागा मिळवून आपला भगवा डौलाने फडकविला. नारायण राणेंनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत २००५ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पुढील ९ वर्षे जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच सत्तास्थाने काँग्रेसकडे होती. मात्र, २०१४च्या निवडणुकीत केवळ कणकवली विधानसभा मतदार संघ तेवढा काँग्रेसकडे राहिला आणि उर्वरित कुडाळ आणि सावंतवाडी हे दोन्ही मतदार संघ सेनेने पुन्हा मिळविले. त्यामुळे राणेंनी एकेकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात शिवसेनेला पुन्हा उभारी मिळण्यासाठी तब्बल ९ वर्षे संघर्ष करावा लागला. राणेंच्या वेळची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती. तर आताची शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आहे. ही शिवसेना उभारण्यासाठी वैभव नाईक जे एकेकाळचे काँग्रेसचे निष्ठावान होते आणि दीपक केसरकर जे एकेकाळचे राष्ट्रवादीचे निष्ठावान होते. त्यामुळे शिवसेनेच्या बदलत्या नेतृत्वाला अपेक्षित नेतेमंडळींनी पुन्हा एकदा राणेंना चितपट करून जिल्ह्यात भगवा फडकविला.


सेनेने गत विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मोठी बाजी मारली. यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक असो, नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक असो वा ग्रामपंचायत निवडणूक. राणेंची काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातच खरी लढत होत गेली. नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेची सत्ता काँग्रेसकडे राहिली.
मात्र, शिवसेनेचे जिल्हा परिषदेमधील सदस्यही वाढले. काही पंचायत समित्याही सेनेच्या ताब्यात आल्या. त्यामुळे राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष कायम राहिला. त्यातच दोन वर्षांपूर्वी राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला. या पक्षाने केंद्रातील एनडीएला पाठिंबा दिल्यानंतर राणेंना भाजपने राज्यसभेवर खासदार केले. म्हणजे दोन वर्षांपूर्वीपासून राणे भाजपामध्ये येण्यासाठी इच्छुक होते.


मात्र, राणेंना भाजपामध्ये घेण्यासाठी शिवसेनेने विरोध केल्यामुळे राणेंचा भाजपा प्रवेश रखडला होता. राणेंना थेट भाजपा प्रवेश न मिळाल्यामुळे भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांना तोपर्यंत स्वतंत्र पक्ष काढण्याची संकल्पना दिली
असावी. त्यातून राणेंनी पक्ष स्थापन केला. राणेंनी पक्ष स्थापन केल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या पक्षाचे भाजपामध्ये विलिनीकरण करण्याची संकल्पना ही बहुधा त्यावेळीच ठरली असावी.


राणेंनी जर त्यावेळी पक्ष स्थापन न करता भाजपामध्ये प्रवेश घेतला असता तर शिवसेना आणि भाजपचे गठबंधन तुटले असते. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असते. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला डावलून भाजपाला स्वतंत्र लढायचे नव्हते. कारण भाजपाला लोकसभेत वर्चस्व मिळविण्यासाठी प्रत्येक राज्यातील त्यांच्या समविचारी असणाºया पक्षांशी युती करायची होती. त्यामुळे भाजपाच्या नेतृत्वाने राणेंना पक्षात प्रवेश दिला नाही. मात्र, त्यांना राज्यसभेवर खासदार करून आपल्या बंधनात अडकून ठेवले होते. त्यामागे महत्त्वाची भूमिका अशीच होती की राणे यांच्या रुपाने कोकणात भाजपाला नेतृत्व निर्माण होईल.
आताच्या घडीला एकही आमदार नसलेला कोकण हा भाजपाचा एकमेव प्रदेश असल्याने भविष्यात राणेंच्या रुपाने कोकणात भाजपाला आमदार मिळतील. त्यामुळे राणेंना त्यावेळी थेट भाजपात प्रवेश मिळाला नाही. मात्र, खासदारकी मिळाली आणि राणे पुन्हा सत्ताधारी पक्षात आले. राणे आणि शिवसेना नेतृत्व यांच्यातील राजकीय लढाई सर्वश्रुत आहे. त्यामुळे भविष्यात युती तुटली तर राणेंचा वापर भाजपाला मोठ्या प्रमाणावर होणार आहे.


विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युतीचे घोंगडे अजूनही भिजत पडले आहे. दोन्ही पक्षांना स्वतंत्र लढण्याची इच्छा आहे. मात्र, सेना नेतृत्वाला अंतर्गत पक्षाचे आमदार फुटून भाजपामध्ये जाण्याची भीती वाटत असल्यानेच सेनेकडून अतिशय सावध पवित्रा घेतला जात आहे.
नारायण राणेंनी आपण लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा वारंवार केली आहे. प्रत्यक्षात त्यांचा प्रवेश कधी होतो ?
आणि युती टिकते की फिस्कटते ते येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल. जिल्ह्यातील राजकारण मात्र, त्यानंतरच खºया अर्थाने वेग घेणार आहे.

Web Title: mahayuti politics depends on narayan rane's move in sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.