महेंद्रचा नक्षीदार कामाचा लौकिक

By admin | Published: August 6, 2015 09:49 PM2015-08-06T21:49:19+5:302015-08-06T21:49:19+5:30

तीन पिढ्यांची कमाई : आयुष्य घडविण्यासाठी त्याने केली परंपरागत व्यवसायाचीच निवड

Mahendra's fictional works | महेंद्रचा नक्षीदार कामाचा लौकिक

महेंद्रचा नक्षीदार कामाचा लौकिक

Next

प्रसन्न राणे - सावंतवाडीराज्यात सावंतवाडीची ओळख करून देणारी लाकडी खेळणी बनविण्याची किमया आजही येथील कारागिरांनी जीवापाड जपली आहे. असाच एक तरुण लहानपणापासून लाकडी खेळण्यांबरोबरच विविध वस्तू घडवीत आयुष्य घडवत आहे. महेंद्र गुडिगार हे त्याचे नाव.शिक्षणातील स्पर्धेपेक्षा उदरनिर्वाहासाठीचा आपला व्यवसायच करिअर मानून कार्यरत राहिलेल्या महेंद्रने या व्यवसायाला एक वेगळी दिशा देण्याचे काम केले आहे. आज त्याच्यामार्फत बनलेल्या वस्तूंना महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, गोवा आदी राज्यांतही मोठी मागणी आहे. कोलगाव येथील आपल्या निवासस्थानी गुडिगार कुटुंबीय गेली तीस ते चाळीस वर्षे लाकडी वस्तू बनविण्याचा व्यवसाय करीत आहे. सुरुवातीला घरगुती स्वरूपातील व्यवसायाला त्यांच्या कारागिरीने महत्त्व आले. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढत गेला तसतशी विक्री वाढू लागली. आपल्या या व्यवसायाचे त्यांनी मंजुनाथ कंपनी असे नामकरण केले. व्यवसायाला वृद्धी मिळेल तशी कारागिरांची उपलब्धता त्यांनी घरातूनच निर्माण केली. घरातील सर्वच व्यक्ती लाकडी वस्तू तयार करण्याच्या कामात वाक्बगार आहेत. यामध्ये कोरीव काम केलेले रंगीबेरंगी पाट, माटी, आदाळे, पोळपाट, दरवाजांची उबली तयार करण्यावर त्यांचा मोठा भर आहे; पण त्याचबरोबर मुख्य व्यवसायाला बगल न देता त्यांनी खेळण्यातही नवनिर्मिती केली आहे. दिवस-रात्र मेहनत करून लाकडे कोरणाऱ्या महेंद्रने या व्यवसायात नवी भर घातली. त्याने तयार केलेल्या पाटांवर अतिशय सुरेख असे नक्षीकाम करण्यास सुरुवात केली. यासाठी कठोर मेहनत लागते. शिवाय ती वेळखाऊ असतानाही त्याने ती स्वीकारत या व्यवसायाला नावीन्याचे स्वरूप निर्माण करून दिले. लाकडी वस्तूंना गणेश चतुर्थीत मोठी मागणी असते. नववधूला सासरी पाठविताना माहेरून विविध प्रकारच्या लाकडी वस्तू भेट दिल्या जातात. ही परंपरा आजही भक्तिभावनेने कोकणात जोपासली जाते. ‘वजा’ स्वरुपात देणाऱ्या वस्तूंमध्ये कोरीव काम केलेले रंगीबेरंगी पाट, आदाळा, गणपतीची माटी व लाकडी फळे, पोळपाट, चौरंग, मकर अशा विविध वस्तू दिल्या जातात. याची खरेदी सावंतवाडीमध्ये गणेश चतुर्थीच्या काळात जोरात सुरू असते. या वस्तू बनविण्याचे काम गुडिगार कुटुंबीयांकडून जोरात सुरू आहे. या वस्तूंवरही नक्षीदार कोरीव कामांची कारागिरीही हे कुटुंबीय करीत आहे. दरवर्षी गुडिगार यांना गोवा, कर्नाटक राज्यासह मुंबई व इतर मुख्य बाजारपेठांतून होलसेल विक्रीसाठी हजारो पाटांची मागणी असतेच. या भागातील व्यावसायिकही येऊन पाट व विविध लाकडी वस्तू खरेदी करतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या लाकडी वस्तू, खेळणी व नक्षीदार साहित्य पोहोचविण्याचे कार्य गुडिगार कुटुंबीय तीन पिढ्या करीत आहे.


आपल्या व्यवसायात प्रचंड कष्टाबरोबरच सचोटीही लागते. आताच्या युवकांकडे ती दुर्मीळ झाल्याचे जाणवते; पण युवकांनी मिळेल त्या संधीचे सोने करण्यासाठी जिद्द ठेवली तर नवीन उद्योग शोधण्यापेक्षा आहे त्या उद्योगालाच नवी दिशा मिळून करिअरही करता येईलच; पण त्याचबरोबर उदरनिर्वाहही सहज करता येईल. सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांच्या प्रसिद्धीला आपल्या कारागिरीने नवी दिशा देण्याचे कार्य युवकांनी अंगीकारावे.
- महेंद्र गुडिगार,
लाकडी वस्तूंचे कारागीर, सावंतवाडी


खेळणी, संगीत साहित्य निर्मितीत नाव
येथे निर्माण होणाऱ्या लाकडी खेळण्यांमध्ये लहान मुलांच्या विविध प्रकारच्या गाड्या, भातुकली सेट, रेल्वे इंजिन, मगर, मासे, उंट, हत्ती, माकड, हरीण, जिराफ, सुतार पक्षी, बदक, हंस, पोपट, देवाचे चौरंग, देवदेवतांची मंदिरे, राजेशाही काळातील गाड्या, बैलगाड्या, गुलाब कार, डंपर, घरे, माड, कंदील, लाकडी खुळखुळे, कळसुली बाहुली, भोवरे, लाकडी दोरी उड्या, मॅजीक कप बॉल, आदी साहित्याला महेंद्र याने नक्षीदार कोरीव कारागिरीने बाजारपेठेत विशेष लौकिक मिळवून दिला आहे.
या बरोबरच संगीत वापरातील सिंगल वीणा, वीणा सेट, गिटार, ढोलकी, तबला, आदी साहित्य निर्मितीतही त्याचा हातखंडा आहे.

Web Title: Mahendra's fictional works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.