मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणात जमिनी जाणा-या देवस्थानांना नुकसानभरपाई मिळणार- महेश जाधव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 03:31 PM2017-12-03T15:31:28+5:302017-12-03T15:31:42+5:30
कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणात ज्या देवस्थान समितीच्या जमिनी जात आहेत त्या देवस्थानांना नुकसानभरपाई मिळण्यासंदर्भात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूरचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याशी चर्चा केली.
कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणात ज्या देवस्थान समितीच्या जमिनी जात आहेत त्या देवस्थानांना नुकसानभरपाई मिळण्यासंदर्भात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूरचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याशी चर्चा केली. देवस्थान समितीचा एकच ना हरकत दाखला देण्याची मागणी केली.
काळसेकर यांनी जाधव यांची कोल्हापूर येथे देवस्थान कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, भाजपा कुडाळ तालुकाध्यक्ष चारूदत्त देसाई, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अभिषेक चव्हाण आदी उपस्थित होते. जाधव यांनी जिल्हा दौ-यावर येऊन जिल्ह्यातील देवस्थाने सुरळीत चालावीत यासाठी मार्गदर्शन करण्यासंदर्भात तसेच जिल्ह्यातील सर्व देवस्थानांना टप्प्याटप्प्याने भेटी देण्या संदर्भात काळसेकर यांनी विनंती केली.
छोट्या मोठ्या गैरसमजुती, कायद्यातील अज्ञान अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक देवस्थान उपसमित्यांमध्ये वाद आहेत. त्यावर कायदेशीर तोडगा काढण्यासाठी जाधव यांनी जातीने लक्ष घालावा अशी आग्रहाची मागणी काळसेकर यांनी केली आणि या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत महेश जाधव यांनी २२ किंवा २३ डिसेंबरच्या दरम्यान जिल्ह्यात येण्याचे आश्वासन यावेळी दिले. नेरूर, वेतोरे आदी गावातील उपसमित्यांच्या पदाधिका-यांनी अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली महेश जाधव यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या.
या चर्चेदरम्यान अतुल काळसेकर यांनी महेश जाधव यांचे आणखी एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान होणा-या जमीन संपादनात काही देवस्थानांच्या जमिनी संपादित होत आहेत, त्यात देवस्थान समिती ४0 टक्के आणि कुळांना ६० टक्के नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. प्रत्येक खातेदारांना देवस्थान समितीचा नाहरकत दाखला आवश्यक असणार आहे. तो गावातील सर्वच कुळांना मिळून एकच देता येईल का यावर विचार करावा, अशी मागणी केली.