मतदान केंद्रावर प्रथमच 'महिला राज'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 09:23 PM2017-10-15T21:23:04+5:302017-10-15T21:23:18+5:30
दरवेळी निवडणूक प्रकिया राबविण्यात पुरूषांबरोबर महिला अधिका-यांचा मोलाचा वाटा असतो. पण यावेळी प्रथमच मतदान केंद्रावर ‘महिला राज’ असणार आहे.
सावंतवाडी : सावंतवाडीत प्रथमच मतदान केंद्रावर ‘महिला राज’ असणार आहे. चराठा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी खास तहासीलदार सतीश कदम यांनी दोन मतदान केंद्रांवर ‘महिला राज’ची नेमणूक केली आहे. यात निवडणूक केंद्र अध्यक्ष, निवडणूक अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी असे मिळून दहा महिला अधिकारी व कर्मचारी काम पाहणार आहेत. या महिलांचे खास चराठावासीयांनी अभिनंदन केले आहे.
दरवेळी निवडणूक प्रकिया राबविण्यात पुरूषांबरोबर महिला अधिका-यांचा मोलाचा वाटा असतो. सर्व निवडणुकीचे काम महिला सांभाळत असतात. पण त्यांच्यावर जबाबदारी देण्यात येत नव्हती. पण यावेळी सावंतवाडीचे तहसीलदार सतीश कदम यांनी एका तरी मतदान केंद्रावर महिला राजची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे चराठा येथील केंद्र क्र. ७ (१) व केंद्र क्र. ७ (२) वर दहा महिला कर्मचाºयांची नेमणूक केली आहे. चराठा गावाच्या ग्रामपंचायत मतदानाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.
प्रामुख्याने दहा महिला अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश असून, यात केंद्र अध्यक्ष नीलम बांदेकर, मतदान अधिकारी सुनिता खांडे, अर्चना राणे, रूपाली मर्गज, पोलीस कर्मचारी राजलक्ष्मी राणे, तर दुसºया मतदान केंद्रावर केंद्रअध्यक्ष सुप्रिया कोरगावकर, मतदान अधिकारी सीमा केसरकर, शुभदा कविटकर, वैष्णवी डेगवेकर, पोलीस कर्मचारी प्रिया नाईक आदींचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच महिलांवर एखाद्या मतदान केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
प्रथमच हा प्रयोग जिल्ह्यात करण्यात आला असल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. चराठावासीयांनीही या ‘महिला राज’चे कौतुक केले. सर्वांना साभाळून घेत काम करणार असल्याचे या महिलांनी सांगितले. आम्ही योग्यपणे मतदान केंद्राची जबाबदारी सांभाळू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.