प्रेमप्रकरणातून युवतीची आत्महत्या
By admin | Published: October 25, 2016 12:45 AM2016-10-25T00:45:08+5:302016-10-25T00:56:45+5:30
वाफोली धरणात घेतली उडी : मृत महाविद्यालयीन विद्यार्थिनी गोव्यातील
बांदा : गोवा-शिरोडा येथील वैद्यकीय महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या सिद्धी राजेंद्र परब (वय २२, रा. विर्नोडा-गोवा) या युवतीने वाफोली (ता. सावंतवाडी) येथील धरणात उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही बाब उघडकीस आली. शिरोडा येथील तिच्या राहत्या खोलीत आत्महत्या करीत असल्याबाबतची चिठ्ठी सापडल्याने तिने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोेलिसांनी व्यक्त केला.
सिद्धी परब ही युवती रविवारी सकाळपासून शिरोडा (गोवा) येथून बेपत्ता होती. याबाबतची तक्रार चुलत भाऊ प्रवीण कृष्णा परब याने फोंडा पोलिसांत दिली होती. फोंडा पोलिसांना रविवारी दुपारी युवतीचे मोबाईल लोकेशन महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे मिळाले.
युवतीचे आजोळ विलवडे येथे असल्याने तिचे शालेय शिक्षण विलवडे हायस्कूल येथे झाले होते. त्यामुळेच ती आपल्या आजोळी गेल्याचा अंदाज नातेवाइकांनी व्यक्त केला. मात्र, सायंकाळपर्यंत ती येथे न पोहोचल्याने नातेवाइकांनी अन्यत्र शोधाशोध केली. मात्र, ती सापडू शकली नाही.
दरम्यान, अज्ञात युवतीची पर्स व चपला वाफोली धरणाच्या विहिरीवर स्थानिकांनी पाहिल्या. ही माहिती समजताच युवतीचे मामा अनिल सावंत यांनी विलवडे ग्रामस्थांसह धरणावर धाव घेतली. पर्समध्ये शिरोडा येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे ओळखपत्र सापडले. त्यावरून खात्री पटली. मात्र, अंधार असल्याने धरणातील पाण्यात शोधमोहीम राबविण्यात आली नाही.
सोमवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास धरणाच्या पाण्यात सिद्धीचा मृतदेह तरंगत्या अवस्थेत सापडला. बांदा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत विच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील व वेंगुर्ले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. तिच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. (प्रतिनिधी)
चिठ्ठीमुळे उलगडला प्रकार
गोवा पोलिसांना सिद्धी परब हिच्या खोलीत चिठ्ठी सापडली. चिठ्ठीत आपले एका युवकावर प्रेम असून, घरच्यांकडून प्रेमविवाहाला विरोध होईल. त्यामुळेच आपण आपली जीवनयात्रा संपवीत असल्याचे तिने नमूद केले. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या काकाला आत्महत्या करीत असल्याचा संदेश मोबाईलवरून पाठविला होता. त्यामुळे पे्रमप्रकरणातूनच सिद्धीने आपले जीवन संपविल्याचा प्राथमिक अंदाज सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप गीते यांनी व्यक्त केला.