मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळल्या
By admin | Published: June 16, 2017 11:20 PM2017-06-16T23:20:47+5:302017-06-16T23:20:47+5:30
मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
बांदा : बांदा-देऊळवाडी येथील श्रीमती किशोरी कृष्णा सावंत हिच्या संशयास्पद मृत्यूची अखेर उकल झाली आहे. त्यांचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणात पोलिसांना हवा असलेला आणि स्थानिकांनी संशय व्यक्त केलेल्या जकिन ऊर्फ बाबा अब्दुल्ला खान (वय २५, रा. बांदा-मुस्लिमवाडी) याला गुरुवारी रात्री कोल्हापूर-लक्ष्मीपुरी येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे देणाऱ्या बाबा खान याने पोलिसी खाक्यासमोर किशोरी सावंत यांचा
दोरीने गळा आवळून खून केल्याची
कबुली दिल्याची माहिती बांदा सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी दिली. याबाबत किशोरी सावंत
यांची मुलगी करिश्मा सावंत हिने त्या संशयित युवकाविरोधात बांदा पोलिसात तक्रार दिली असून, बाबा खान विरोधात कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबा खान याने चार पाच वर्षांपूर्वी किशोरी सावंत यांच्या मुलीची छेड काढली होती. त्यातून त्यांच्यात भांडणही झाले होते. याच रागातून हा खून झाल्याचे प्राथमिक चौकशीत बाबा खान याने सांगितले.
रविवारी ११ जूनला बांदा-देऊळवाडी येथील किशोरी कृष्णा सावंत या मुस्लिमवाडी-भराड येथे संशयास्पद अवस्थेत मृतावस्थेत सापडल्या होत्या. शवविच्छेदनात श्रीमती सावंत यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पोलिसांनी घातपाताच्या शक्यतेने तपासाची सूत्रे फिरवायला सुरुवात केली होती. मात्र, घटनास्थळी कोणताही परिस्थितीजन्य पुरावा आढळला नसल्याने पोलिसांच्या तपासाला मर्यादा येत होत्या. तर स्थानिकांनी याच परिसरातील युवकावर संशय व्यक्त केला होता. मात्र श्रीमती सावंत यांच्या मृत्यूच्या दिवसापासून हा संशियीत युवक परिसरातून गायब झाला होता. तर त्याचा मोबाईलही बंद होता. बांद्यात मच्छी विक्रीचा व्यवसाय करून आपला व मुलांचा चरितार्थ चालविणाऱ्या किशोरी सावंत यांच्या घातपातामुळे या परिसरात खळबळ उडाली होती.
दरम्यान बांदा पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपासाची चक्रे फिरविली. यातील संशयीत बाबा खान याने आपला नेहमीच नंबर बंद ठेवत दुसऱ्या नंबरने आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसही चक्रावले. रविवारी घडलेल्या घटनेनंतर बाबा खान याने याच परिसरातील युवकाला दुचाकीने दोडामार्ग तालुक्यातील आवाडे येथील बहिणीच्या घरी सोडण्यास सांगितल्याचेही तपासात उघड झाले आहे. या युवकालाही चौकशीसाठी बांदा पोलिसांनी पोलीस स्थानकात बोलावले होते. दरम्यान बाबा खान याने आपल्या बहिणीकडून दोनशे रुपये घेत रामघाटमार्गे एसटी बसने कोल्हापूर गाठले. तर हे पैसे कमी पडल्याने त्याने आपल्या बांद्यातील बहिणीकडे दोन हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र तिने पैसे देण्यास नकार दिला.
गायब झाल्याने संशय बळावला
किशोरी सावंत या देऊळवाडीत तर संशियीत बाबा खान हा मुस्लिमवाडीत राहतो. दोन्ही वाड्या जवळ जवळ आहेत. मात्र सावंत यांच्या मृत्यूपूर्वी काही दिवस या भरडावर सातत्याने वावरणारा बाबा खान घटनेच्या दिवसापासून बांद्यातून गायब झाल्याने त्याच्यावरील संशय बळावला. तसेच त्याने आपला मोबाईल बंद ठेवल्याने या प्रकरणात त्याचाच हात असावा अशी ठाम खात्री पोलिसांची पटली आणि पोलिसांच्या तपासाचा मार्ग मोकळा झाला.
मोबाईलमुळेच सापडला संशयीत
पोलिसांनी आपल्याला पकडू नये म्हणून आपला मोबाईल बंद करून बाबा खान कोल्हापूरला गेला खरा. मात्र ज्या मोबाईलवर त्याचा विश्वास होता तोच मोबाईल काही वेळासाठी चालू केला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.