चांगल्या कार्यात सातत्य ठेवा

By admin | Published: December 15, 2014 07:55 PM2014-12-15T19:55:12+5:302014-12-16T00:16:43+5:30

समीर घारे : नाटळ येथे तंटामुक्त पुरस्कार वितरण

Maintain good work | चांगल्या कार्यात सातत्य ठेवा

चांगल्या कार्यात सातत्य ठेवा

Next

कनेडी : शासनाच्या योजना चांगल्या पद्धतीने राबवत विविध पुरस्कार प्राप्त होतात. त्याचे साक्षीदार तुम्ही आहात. कुठलेही पुरस्कार मिळविणे सोपे असते; परंतु त्यांच्यातील सातत्य टिकविणे फार कठीण असते, असे प्रतिपादन कणकवलीचे तहसीलदार समीर घारे यांनी नाटळ येथे केले.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती नाटळ व ग्रामपंचायत नाटळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तंटामुक्त पुरस्कार वितरण समारंभात समीर घारे बोलत होते. गावाला सन २०१२-१३ मध्ये हा पुरस्कार मिळाला होता.
समीर घारे पुढे म्हणाले, चांगले काम करताना ते प्रथम घरापासून केले पाहिजे. तरच त्याची परिणामकता समजून येते. सर्वसामान्य माणसांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली पाहिजे. प्रत्येक तरुणामध्ये ही जाणीव ज्यावेळी निर्माण होईल त्याचवेळी देश बलशाली होईल. स्त्री-भ्रूणहत्या रोखली गेली पाहिजे. आज मुलांपेक्षा मुली प्रत्येक टप्प्यावर पुढे आहेत. यापुढे असा भेदभाव करू नका.
पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे म्हणाले, गाव सुरक्षिततेसाठी प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन करणार आहोत. यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे, नायब तहसीलदार कांता खटावकर, डॉ. बी. एस. म्हाडेश्वर, सरपंच रवींद्र सुतार, उपसरपंच प्रदीप सावंत, दारिस्ते पोलीस पाटील हेमंत सावंत, सहायक पोलीस सबइन्स्पेक्टर पी. एम. परब, तंटामुक्त समिती अध्यक्ष उत्तम मिसाळ, दीपक सावंत, सुरेश वसगडेकर, अर्जुन दळवी, ग्रामविकास अधिकारी जी. जे. डिसोजा, तलाठी जी. व्ही. शिंदे, समिती सदस्य मिलिंद डोंगरे, पोलीस पाटील शंकर जाधव, उपस्थित होते.
पुरस्कार वितरण सोहळ्यात क्रीडा स्पर्धा, अपंग लाभार्थी, कन्यारत्न-माहेर भेट, व्यसनमुक्ती, आदर्श बचतगट, तंटामुक्त पुरस्कारात विशेष प्रयत्न केलेल्या व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्ती, गुणवंत विद्यार्थी, सरपंच, उपसरपंच अशा दीडशे सत्कारमूर्तींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन संदीप तांबे, प्रास्ताविक प्रदीप सावंत यांनी, तर आभार डॉ. सत्यवान नाटळकर यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: Maintain good work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.