जिल्हा राष्ट्रवादीत लवकरच मोठे बदल

By admin | Published: December 10, 2014 10:17 PM2014-12-10T22:17:11+5:302014-12-10T23:51:10+5:30

अतुल रावराणे : पक्षनेतृत्वाकडून दगाबाजीची दखल

Major changes in district NCP soon | जिल्हा राष्ट्रवादीत लवकरच मोठे बदल

जिल्हा राष्ट्रवादीत लवकरच मोठे बदल

Next

वैभववाडी : विधानसभा निवडणुकीत कणकवलीसह तिन्ही मतदारसंघात पक्षाच्याच काही निवडक पदाधिकाऱ्यांनी विरोधी उमेदवारांशी गुप्तसंधान साधून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना दगा दिला. या प्रकाराची पक्षनेतृत्वाने गंभीर दखल घेतली असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादीत लवकरच मोठ्या बदलाचे संकेत नेतृत्वाने दिले आहेत, अशी माहिती युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.
येथील सार्वजनिक बांधकामच्या विश्रामगृहात रावराणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महेश रावराणे, धुळाजी काळे आदी उपस्थित होते. अतुल रावराणे म्हणाले, शेवटच्या क्षणी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा झाली. त्याचप्रमाणे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय नव्हता.
त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. त्याचबरोबर काही पदाधिकाऱ्यांनी विरोधकांशी संधान साधल्यामुळे फटकाही मोठ्या प्रमाणात बसला. ही बाब आपण नुकत्याच मुंबईत झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे मांडली.
राष्ट्रवादी भवनातील आढावा बैठकीला पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसेपाटील, छगन भुजबळ आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते. पक्षाचे निरीक्षक आमदार किरण पावसकर यांनीही निवडणूक काळातील जिल्ह्यातील स्थिती नेतृत्वासमोर मांडली.
त्यामुळे निवडणुकीतील काही पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या दगाबाजीची पक्ष नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असून त्या अनुषंगाने जिल्ह्यात पक्षांतर्गत फेरबदलाचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आठही तालुक्यात राष्ट्रवादीच्या पुनर्बांधणीसाठी आपणास सूचना दिल्या आहेत, असे रावराणे यांनी स्पष्ट केले.
रावराणे म्हणाले, पक्षश्रेष्ठींच्या सुचनेप्रमाणे कणकवली मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याचा दौरा आपण करणार आहोत. या दौऱ्यात जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, ज्येष्ठ नेते नंदूशेठ घाटे, माजी आमदार पुष्पसेन सावंत, सुरेश दळवी, प्रसाद रेगे, युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, अबिद नाईक आदींसोबत चर्चा करून पक्षाची पुनर्बांधणी करताना तरूणांना संधी देण्याचा प्रयत्न राहील.
तसेच संघटना बांधणीच्या पार्श्वभूमीवर काही नेत्यांचे दौरेही आगामी काळात होतील, असे
अतुल रावराणे यांनी यावेळी
सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Major changes in district NCP soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.