मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरगतीने वैभववाडीवर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 11:02 PM2018-08-07T23:02:14+5:302018-08-07T23:02:27+5:30

Major Kaustubh Rane's Veeragati laughed at Vaibhavavadi | मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरगतीने वैभववाडीवर शोककळा

मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरगतीने वैभववाडीवर शोककळा

Next

प्रकाश काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैभववाडी : उत्तर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वैभववाडी तालुक्यातील सडुरेचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (रावराणे) (२९) यांना वीरगती आल्याने तालुक्यावर शोककळा पसरली. मेजर कौस्तुभच्या वीरगतीचे वृत्त कळताच त्यांचे सडुरे गाव सुन्न झाले. गेल्या वर्षीच्या गणशोत्सवातील भेट त्यांच्या येथील कुटुबीयांसाठी अखेरचीच ठरली आहे.
सोमवारी रात्री उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये चार भारतीय जवान शहीद झाले. त्यात शहीद कौस्तुभ यांचा समावेश असल्याचे सायंकाळी कळताच वैभववाडी तालुकावासिय शोकसागरात बुडाले. परंतु, त्यांचे कुटुंब कायमस्वरुपी मुंबई येथे स्थायिक असल्याने गावाशी संपर्क कमीच होता. त्यामुळे शहीद कौस्तुभ राणे यांचे नक्की गाव कोणते याबद्दल संभ्रम होता. शेवटी ते सडुरेतील असल्याचे निष्पन्न झाले. त्यातही त्यांच्या वडिलांना गावात प्रकाश ऐवजी ‘कुमार’ या नावाने ओळखले जात असल्याने सुरुवातीला गोंधळाची स्थिती होती. मात्र, शहीद कौस्तुभ यांचे सख्खे चुलत चुलते माजी सरपंच विजय रावराणे यांनी मुंबईत संपर्क साधल्यानंतर खात्री होताच सूर्यास्ताला सडुरे गाव सुन्न झाले.
शहीद कौस्तुभ हे एकुलते होते. सध्या ते मेजर पदावर होते. चार वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला असून गतवर्षी ते पत्नीला घेऊन गणपतीचे दर्शन घेण्यास आले होते. त्यावेळी काही तासांचा त्यांचा सहवास कुटुंबीयांसह नातेवाईक व गावक-यांनाही लाभला होता. शहीद कौस्तुभ यांचे आईवडील कायमस्वरुपी मुंबईत वास्तव्यास असले तरी गावचे त्यांचे कुटुंब एकत्रच आहे. त्यामुळे कौस्तुभ यांच्या वीरगतीमुळे त्यांच्या संपुर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.
देशासाठी शहीद झाल्याचा अभिमान
शहीद कौस्तुभ राणे (रावराणे) सैन्यात अधिकारी असल्याने गावाकडे येणे फार होत नव्हते. तरीही पत्नीसह गेल्यावर्षीच्या गणपती उत्सवातील गौरीच्या सणाला ते आले होते. तेव्हा कुटुंबीयांसह एकत्र जेवण करुन ते मुंबईला गेले. प्रकाश ऊर्फ कुमार यांचा कौस्तुभ एकुलता असल्याने त्याचे वीरमरण हा आमच्या कुटुंबावर आघात असून दु:ख डोंगराएवढे आहे. त्याचबरोबर कौस्तुभ भारतमातेच्या रक्षणासाठी शहीद झाल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे उद्गार त्यांचे चुलते माजी सरपंच विजय रावराणे यांनी काढले.
आज पार्थिव आणणार
मेजर कौस्तुभ यांचे पार्थिव बुधवारी विशेष विमानाने मुंबईत आणले जाणार आहे. त्यानंतर मीरा रोड येथील त्यांच्या निवासस्थानी ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
पाकिस्तानला धडा शिकवा
मेजर कौस्तुभ राणे यांचे हौतात्म्य वाया जाऊ देता कामा नये. असे पराक्रमी लष्करी अधिकारी आणि जवान गमावणे परवडणार नाही. सीमेवर सतत कुरापती काढणारे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना केंद्र सरकारने कायमचा धडा शिकवला पाहिजे, असे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहताना सांगितले.

Web Title: Major Kaustubh Rane's Veeragati laughed at Vaibhavavadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.