तालुका काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल

By admin | Published: March 20, 2017 11:54 PM2017-03-20T23:54:00+5:302017-03-20T23:54:00+5:30

नीतेश राणे : वैभववाडीतील अपयश पदाधिकाऱ्यांचे ; कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याचा फटका

Major reshuffle in taluka Congress | तालुका काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल

तालुका काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल

Next



वैभववाडी : तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी तळागाळात कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही. पदाधिकारी लोकसंपर्कात कमी पडले. अनेक वर्षे सतत पदे मिळाल्यामुळे पदाधिकारी आळसावले. त्याचाच एवढया मोठ्या प्रमाणात पक्षाला फटका बसला आहे. हे माझं अपयश नसून पदाधिकाऱ्यांचे अपयश आहे, असे स्पष्ट करीत तालुका काँग्रेसमध्ये लवकरच मोठे संघटनात्मक फेरबदल झालेले दिसतील, असे आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सोमवारी दुपारी येथील संपर्क कार्यालयात आमदार नीतेश राणे यांनी पदाधिकाऱ्यांची बंद खोलीत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, बांधकाम सभापती दिलीप रावराणे, उपसभापती हर्षदा हरयाण, नगराध्यक्ष संजय चव्हाण, नगरपंचायत सभापती दीपा गजोबार, जिल्हा परिषद सदस्या शारदा कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर पाटील, पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे, नासीर काझी, हुसेन लांजेकर, संजय सावंत, बाळा हरयाण, शुभांगी पवार, वैशाली रावराणे, प्राची तावडे, नगरसेविका अक्षता जैतापकर, समिता कुडाळकर आदी उपस्थित होते.
आमदार नीतेश राणे म्हणाले की, अनेकवर्षे पदे मिळत गेल्यामुळे पदाधिकारी आळसावले होते. पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये संवाद राहिला नाही. जनसंपर्कात पदाधिकारी कमी पडले. विशेष म्हणजे निवडणुकीत ते तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत. याचा फायदा विरोधकांनी घेतला. शेंबड्या पोराप्रमाणे रडत बसणारे आम्ही नाही. संघटनात्मक फेरबदल करुन पक्षाची बांधणी पुन्हा नव्या उमेदीने केली जाईल. संघटना बांधणीत यापूर्वी राहिलेल्या त्रुटी दूर करून संघटनेची घडी आपण पुन्हा बसविणार आहोत. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, स्नेहलता चोरगे यांच्या घरावरील भ्याड हल्ल्याचा आपण निषेध करतो. असे प्रकार भविष्यात घडू नयेत यासाठी पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून चोरगेंना न्याय द्यावा. माझ्या मतदारसंघातील जनतेच्या सुरक्षेसाठी मी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करुन पोलिसांकडे सुपूर्द केली. सीसीटीव्ही यंत्रणेची देखभाल करणाऱ्या एजन्सीचे संपर्क क्रमांक पोलिसांना दिले आहेत. मग दोन महिने सीसीटीव्ही बंद राहत असतील तर पोलीसांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होत आहे. सीसीटीव्ही यंत्रणेचे नियंत्रण करणे पोलिसांना जमणार नसेल तर त्यांनी तसे लेखी द्यावे, त्याचीही व्यवस्था करण्याची आपली तयारी आहे. नंतर मात्र त्याबाबत कुणी शंकाकुशंका काढू नयेत.
आपल्या घरावर राजकीय वैमनस्यातून हल्ला झाला, असा आरोप स्नेहलता चोरगे यांनी केला होता त्याबाबत विचारले असता, राजकारणात इतकी वर्षे काढलेल्या कार्यकर्त्यांचे कुणाशी ना कुणाशी राजकीय वैमनस्य असते. तसे स्नेहलता चोरगे यांचेही असू शकते. त्या बरीच वर्षे आमच्या सोबत होत्या. परंतु, राणेंसोबत असल्यामुळे त्यांच्या घरावर दगड मारण्याची कुणाची हिंमत झाली नाही. याचाच अर्थ राणे आपल्या कार्यकर्त्यांचे संरक्षण करतात. राणेंचा हात डोक्यावरुन बाजूला गेल्यावर ‘खिशातले दगड’ बाहेर येतात. यावरुन ‘राणे’ नावाचे ‘वजन’ चोरगेंना कळले असेल, असे मिश्किल उत्तर आमदार नीतेश राणे यांनी दिले.
आमदार म्हणून मी आणि तालुका काँग्रेसच्यावतीने १ एप्रिलपासून ‘योजना तुमच्या दारी’ उपक्रमाचा शुभारंभ करीत आहोत. केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा परिषदेच्या लोकोपयोगी योजनांचा सर्वसामान्य जनतेला लाभ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.
यासाठी आवश्यक कागदपत्रे आणून दिली तर प्रस्ताव पूर्ण करुन लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक दररोज सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत पक्ष कार्यालयात उपलब्ध असतील असे राणे यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)
रात्रभर दगड मोजत होत्या का?

स्नेहलता चोरगे यांच्या घरावर रात्री दगडफेक झाली असे त्यांनीच तक्रारीत म्हटले आहे. रात्री दगडफेक झालेली असताना तक्रार सकाळी का दिली? यावरुन हल्ल्याबाबत आपल्या मनात संशय आहे. रात्री घरावर हल्ला झाल्यानंतर सकाळपर्यंत त्या दगड मोजत होत्या का? असा खोचक प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित करीत पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने चालू करुन घ्यावेत. कधी कुणावर दगडफेक होईल हे काही सांगता येत नाही, असा टोला आमदार नीतेश राणे यांनी लगावला.

Web Title: Major reshuffle in taluka Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.