मुलांसाठी रेल्वेचे अर्धे तिकीट करा
By Admin | Published: September 11, 2016 09:41 PM2016-09-11T21:41:06+5:302016-09-11T21:56:07+5:30
सुरेश प्रभू यांना निवेदन : बॅ. नाथ पै स्कूलच्या विद्यार्थ्यांची मागणी
कुडाळ : ‘साहेब, आम्हाला पुन्हा राखीव जागांसाठी रेल्वेचे अर्धे तिकीट सुरू करा,’ अशी आर्त विनवणी कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या पाच ते बारा वयोगटातील छोट्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनातून केली. ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रभू या छोट्या विद्यार्थ्यांचाच नव्हे, तर देशातील सर्व मुलांना पावणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा दौऱ्यावर आलेले मंत्री सुरेश प्रभू हे कुडाळ येथे मराठा सभागृहातील एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आले असताना त्या ठिकाणी बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या पाच ते बारा वयोगटातील छोट्या विद्यार्थ्यांनी प्रभू यांना मुलांसाठी रेल्वेत अर्धे तिकीटच आकारण्यात यावे, या मागणीचे निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या पाच ते बारा वयोगटातील मुलांना अर्धे तिकीट आकारले जात होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच रेल्वे प्रशासनाकडून पाच ते बारा वयोगटातील मुलांना रेल्वेतील राखीव जागेसाठी पूर्ण आकार द्यावा लागेल, असा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. रेल्वे प्रशासनाने काढलेल्या या आदेशामुळे देशातील बरीच मुले नाराज झाली आहेत.
विद्यार्थिनीने लिहिले निवेदन
विद्यार्थ्यांनी रेल्वेमंत्री प्रभूंना मुलांना रेल्वेमध्ये अर्धे तिकीट देण्याचे निवेदन दिले आहे, ते निवेदन स्कूलची आठवीतील विद्यार्थिनी रचना गावडे हिने लिहिले आहे. या निवेदनावर सह्याही विद्यार्थ्यांच्याच आहेत.
रेल्वेमंत्री मागणीची दखल घेतील काय?
वाराणसीमध्ये रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका आठ महिन्यांच्या मुलाची भूक भागविण्यासाठी रेल्वेमंत्री प्रभू यांनी पुढील रेल्वे ठाण्यात दूध उपलब्ध करून देतात. अशा या नुकत्याच उमललेल्या या कळीसाठी त्यांची धडपड सुरू असेल, तर आमच्यासाठीच या नियमांचे बंधन का, असा प्रश्नही या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. अशा या नियम व अटींमुळे मुलांच्या आनंदावर विरजण पडत असेल तर हे नियम व अटी कशासाठी बनविले जातात, असाही प्रश्न या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी या मुलांसोबत बॅ. नाथ पै संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, स्कूलच्या प्राचार्या स्वरा गावडे तसेच इतर शिक्षकवृंद उपस्थित होता.