महामार्ग चौपदरीकरणाचे काम दर्जेदार करा : विनय देशपांडे यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 06:52 PM2019-01-17T18:52:30+5:302019-01-17T18:53:53+5:30
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रत्येक ठेकेदाराला दर्जेदारच करावे लागेल. या रस्त्याची १५ वर्षांची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम करता येणार नाही. महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दर्जेदार काम होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश महामार्ग प्राधिकरणचे मुख्य अभियंता विनय देशपांडे यांनी दिले आहेत.
कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रत्येक ठेकेदाराला दर्जेदारच करावे लागेल. या रस्त्याची १५ वर्षांची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम करता येणार नाही. महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दर्जेदार काम होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश महामार्ग प्राधिकरणचे मुख्य अभियंता विनय देशपांडे यांनी दिले आहेत.
कणकवली येथे महामार्ग चौपदरीकरणाच्या पाहणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बुधवारी विनय देशपांडे आले होते. यावेळी मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर, त्याचप्रमाणे कणकवलीतील नागरिकांनी त्यांची भेट घेऊन काम सुरू असताना होणाऱ्या त्रासाबद्दलचा पाढा त्यांच्यासमोर वाचला.
यावेळी त्यांच्यासमवेत कार्यकारी अभियंता प्रकाश बनगोसावी, उपअभियंता प्रकाश शेडेकर, दिलीप बिल्डकॉनचे अधिकारी यादव, मनसेचे संतोष कुडाळकर, अनिल राणे, दत्ताराम बिडवाडकर, प्रमोद राणे, संतोष सावंत, निखील आचरेकर, कणकवलीतील नागरिक अनंत पारकर, बबली राणे, प्रदीप मांजरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत परशुराम उपरकर यांनी महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे देशपांडे यांच्या निदर्शनास आणून दिले. अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत. याचीही कल्पना त्यांना दिली. बांधकाम करताना योग्य पद्धतीचे स्टील वापरले जात नाही अशी तक्रारही यावेळी केली.
परिवर्तीत मार्ग हे डांबरी असणे आवश्यक आहेत. मात्र, कच्चे रस्ते करून अपघातास निमंत्रण दिले जात आहे. याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यावर विनय देशपांडे यांनी जी कामे निकृष्ट असतील त्यांची फेरचौकशी करण्याच्या सूचना प्रकाश शेडेकर यांना दिल्या आणि ते काम उखडून काढून त्याठिकाणी पुन्हा स्लॅब घातले जावे, ज्या रस्त्यांना तडे गेलेले आहेत तो रस्ता खोदून पुन्हा काँक्रिटने केला जावा अशा विविध सूचना यावेळी दिल्या.
जिल्हा परिषदेची परवानगी आवश्यक!
कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवरायांचा पुतळा सुरक्षित ठिकाणी हलवावा याकडे परशुराम उपरकर यांनी विनय देशपांडे यांचे लक्ष वेधले. जिल्हा परिषदेच्या हद्दीत हा पुतळा ठेवण्यासंदर्भातही त्यांनी सल्लामसलत केली. यावेळी देशपांडे यांनी जिल्हा परिषदेची जागा असेल तर तशी परवानगी त्यांच्याकडून आपल्याला घ्यावी लागेल, असे यावेळी सांगितले.