विकासासाठी संघटनात्मक प्रयत्न करावेत
By admin | Published: December 15, 2015 11:13 PM2015-12-15T23:13:53+5:302015-12-15T23:43:25+5:30
विलास गुडेकर : मळगावातील कुंभार समाज मेळाव्यात बांधवांना मार्गदर्शन
तळवडे : जिल्ह्यातील कुंभार समाजातील बांधवांनी एकजूट करत एकीने विकास साधण्यासाठी संघटनात्मक पातळीवर कार्य करावे. आजच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाकडे वळून शासकीय नोकऱ्यात बाजी मारावी, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष तसेच कोकण विभाग उपाध्यक्ष विलास गुडेकर यांनी व्यक्त केले. मळगाव येथे संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ, सावंतवाडी व जिल्हा मंडळातर्फे कुंभार बांधवांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला वेंगुर्ले, दोडामार्ग व सावंतवाडी या तिन्ही तालुक्यातील समाजबांधवांनी उपस्थिती दर्शविली.या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष विलास गुडेकर, उपाध्यक्ष यशवंत शेंदुलकर, कणकवली पंचायत समिती उपसभापती बाबा वर्देकर, जिल्हा सचिव दिलीप हिंदळेकर, जिल्हा सल्लागार वासुदेव शिरोडकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मनोहर कुंभार, काशिनाथ वेंगुर्लेकर, जानकी शिरोडकर, ज्येष्ठ गणेश मूर्तीकार विलास मांजरेकर, सावंतवाडी तालुका सचिव सुहास पिकुळकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. गणपत शिरोडकर व सावंतवाडी तालुका संत गोरा कुं भार समाज उत्कर्ष मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्याला सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्यातील गणेश मूर्तिकार, उत्कृष्ट कारागीर तसेच शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट कारागिरांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.त्याचप्रमाणे आज कोकणात विशेष करून जिल्ह्यात अनेक कुंभार समाज बांधव वीटभट्ट्या लावतात. पण पावसाळी हंगामात किंवा अतिवृष्टीने वीटभट्ट्यांचे नुकसान होते. याची नुकसान भरपाई मिळण्याकरिता कुंभार समाजाचे राज्य संघटना अध्यक्ष संजय राठे यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे याची वेळी ३० डिसेंबर रोजी वेळ घेतली आहे. (प्रतिनिधी)
मेळाव्यातील समाजाच्या मुख्य मागण्या
कुंभार समाज हा इतर मागास प्रवर्गात येतो. या प्रवर्गात इतर मागास वर्गाची संख्या मोठी असल्याने कुंभार समाजातील लोकांना या योजनांचा हव्या त्या प्रमाणात फायदा होत नाही. त्यामुळे कुंभार समाजाला भटक्या जातीत समाविष्ट करण्यात यावे, संत गोरा कुंभार समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, राज्य व जिल्हा स्तरावर, माती व कलाकृती समिती शासनाने स्थापन करावी, आयटीआयमध्ये कुंभार, कला विषय सुरू करावा, मंत्रिमंडळात कुंभार समाजातील प्रतिनिधींना सदस्यत्व (स्थान) द्यावे, अशा विविध मागण्या कुंभार समाज राज्य संघटना व जिल्हा संघटनेतर्फे शासनाकडे करण्यात आल्या.